Los Angeles Wildfires : लॉस एंजेलिस मध्ये जंगलात लागलेली ही आग आता ३५००० एकर परिसरात पोहचली आहे. यामुळे १० लाख घरांना झळ पोहचली असून, हजारो लोकांनी आपली घरे सोडली आहेत. ४.५० लाख करोड नुकसानी चा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, अमेरिकेतील सर्वच विमा कंपन्या चिंतेत आहेत. त्यांच्या मते ही आग इतिहासातील सगळ्यात महागडी ठरू शकते.
लॉस एंजेलिस ( वास्तव पोस्ट ) : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये पसरलेल्या वणव्यामुळे मृतांची संख्या ११ वर पोहोचली आहे. लॉस एंजेलिस काऊंटीचे मेडिकल एक्झामिनर यांनी या आकडेवारीला दुजोरा दिला असून, या आगीमुळे मृत्यू झालेल्यांची सध्या ओळख पटवली जात आहे. ही आग सध्या लॉस एंजेलिसमध्ये तब्बल १४ हजार एकरच्या परिसरामध्ये पसरली आहे.

दरम्यान, लवकरच राष्ट्राध्यक्ष पदावरुन पायउतार होणारे जो बायडन यांनी घोषणा केली आहे की, सरकार दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये पुढील सहा महिन्यांकरिता ‘जीवन आणि मालमत्तेचं संरक्षण’ करण्यासाठीचा सर्व खर्च उचलणार असल्याचे एक निवेदन प्रसारित केले आहे. त्यामध्ये बायडन यांनी म्हटलं आहे की, “मृतांची ओळख पटवण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. कारण, सध्या तरी भीषण आगीमुळे तसेच सुरक्षेच्या कारणास्तव ज्या ठिकाणी हे मृत्यू झाले आहेत, त्या ठिकाणी डिपार्टमेंट ऑफ मेडिकल एक्झामिनर पोहचण्यास असमर्थ आहेत.”

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ही आग विझवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर लक्ष ठेवण्यासाठी आपला इटलीचा दौरा रद्द केला आहे. राष्ट्राध्यक्ष पदावरुन लवकरच पायउतार होणाऱ्या जो बायडन यांचा हा शेवटचा परराष्ट्र दौरा होता. लॉस एंजेलिसमधील आगीमुळे एक लाखाहून अधिक लोकांनी आपली घरे सोडली आहेत.
जोरदार वाहणारे वारे आणि कोरड्या वातावरणामुळे मदत आणि बचाव कार्यातही बऱ्याच अडचणी येत आहेत. यामुळे बऱ्याच ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले, “या आगीला सामोरं जाण्याकरिता आम्ही काहीही करण्यासाठी तयार आहोत. लोकांचं आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल. मात्र, त्यासाठी थोडा अधिक वेळ लागेल. आम्ही हे काम करत आहोत.”

“आग विझवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अग्निशमन दलालाही आता पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. लोकांना पाणी वाचवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आग विझवण्यासाठी पाण्याचा अतिवापर करण्यात आल्यास लोकांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी मिळणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो.”
अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे, तपास अधिकारी एवढी विनाशकारी आग कशी लागली याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. लॉस एंजेलिसमधील आगीत लाखो डॉलर्सचे नुकसान झाले आहे. ही आग आता जंगलाकडून शहरांकडे आली असून हॉलीवुड या आगीच्या चपाट्यात आले असून अनेक हॉलिवूड कलाकारांची घरे जळून खाक झाली आहेत.

नॅशनल फायर प्रोटेक्शन असोसिएशनच्या मते, अमेरिकेत वीज पडणे हे आगीचे सर्वात सामान्य कारण असले तरी, तपासकर्त्यांनी सध्या वीज पडणे हे आगीचे कारण असल्याचे नाकारलं आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पॅलिसेड्स परिसरात किंवा ईटन आगीच्या आसपासच्या परिसरात वीज कोसळल्याचे वृत्त नाही. या आगीमागे घातपात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून आतापर्यंत २० संशयितांना ताब्यात घेतले आहे.
