जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालयात एनसीसी विभागातर्फे २५ व्या कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला.
कारगिल विजय दिवस ही भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी घटना आहे. २५ वर्षांपूर्वी पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठिकाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले. त्यानंतर २६ जुलै या दिवशी भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याला धूळ चारुन कारगिलच्या पर्वतरांगांवर पुन्हा आपला तिरंगा फडकावला. यामुळे दरवर्षी २६ जुलै हा दिवस आपण ‘कारगिल युद्ध दिवस’ म्हणून साजरा करतो. हा दिवस देशासाठी लढणाऱ्या आणि संरक्षणासाठी बलिदान दिलेल्या शूरवीर जवानांची आठवण करुन देतो.
यावेळी मु. जे. महाविद्यालय एनसीसी कॅडेट्सने शहीद कॅप्टन विक्रम भद्रा, ग्रीनेडियर योगेंद्रसिंग यादव, मेजर मनोजकुमार पांडे, लेफ्टनंट कर्नल बलवान सिंग, मेजर राजेश सिंग, रायफल मॅन संजय कुमार, मेजर विवेक गुप्ता, लेफ्टनंट केसिंग नॉनग्रुम, नाईक दिघेन्द्र कुमार, कॅप्टन नायकेझाकूओ केनग्रुसे, कॅप्टन अमोल कालिया इत्यादी वीर जवानांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले.
कारगिल विजय दिनानिमित्त एनसीसी कॅडेट्सने विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. यात वक्तृत्व, निबंध, पोस्टर स्पर्धा, डॉक्युमेंटरी/फिल्म प्रदर्शन आणि वृक्षारोपणही करण्यात आले. या वेळी प्राचार्य सं.ना. भारंबे, कॅप्टन योगेश बोरसे, लेफ्टनंट गोविंद पवार आणि एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते.
