पाचोरा | दि.२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी आज पाचोरा शहरातून निघालेल्या भव्य प्रचार फेरीला नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या रॅलीचे ठिकठिकाणी जबरदस्त जल्लोषात स्वागत करण्यात आले. या माध्यमातून जळगाव लोकसभा मतदारसंघात परिवर्तनाची लाट उसळल्याचे दिसून आले.

गेल्या अनेक दिवसांपासून पाचोरा आणि भडगाव शहरातल्या ग्रामीण भागातून प्रचार फेर्या काढल्यानंतर आज करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी पाचोरा शहरातून भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवतीर्थ कार्यालयावरून ही रॅली काढण्यात आली. प्रारंभी शहरातील सर्व महापुरूषांच्या पुतळ्यांना वंदन करून शहराच्या विविध भागांमधील नागरिकांशी संवाद साधत रॅली पुढे निघाली. या रॅलीचे नेतृत्व शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. या प्रचार फेरीत करण पाटील यांच्या पत्नी अंजलीताई पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

या प्रचार फेरीच्या माध्यमातून वैशालीताई व अंजलीताई पाटील यांनी हजारो पाचोरेकर स्त्री-पुरूषांशी संवाद साधत परिवर्तनासाठी करण पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले. या फेरीचे ठिकठिकाणी ढोल-ताशांचा गजर, पुष्पवर्षाव आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. या फेरीचे ठिकठिकाणी लहान-मोठ्या व्यापार्यांनी अतिशय उत्स्फुर्तपणे स्वागत केले. तर वैशालीताई व अंजलीताई यांनी रॅली थांबवून थेट भाजी मार्केटमधील विक्रेते आणि ग्राहकांशी संवाद साधल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. याप्रसंगी बहुतांश लोकांनी करणदादा पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला. यानंतर सायंकाळी शहरातील उर्वरित भागातून प्रचार फेरी काढण्यात येणार आहे.
प्रचार फेरीत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, आम आदमी पक्ष आणि मित्रपक्षांच्या आघाडीतील विविध नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
