जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दि २२ बुधवार रोजी परधाडे ते माहिजी दरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताचे खरे कारण समोर आले आहे. काल संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस मध्ये आग लागल्याचा समज झाल्याने झालेल्या गोंधळामुळे प्रवाशांनी भितीपोटी डब्यातून खाली उड्या मारल्या. आणि नेमके याच वेळी बाजूच्या रेल्वे रुळावरुन कर्नाटक एक्सप्रेस आल्याने त्याखाली काही प्रवासी चिरडले गेले. या अपघातात आतापर्यंत मृतांचा आकड़ा १२ झाला असून जखमींवर जळगाव आणि पाचोरा येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे समजते.
दरम्यान परधाडे ते माहीजी दरम्यान पुष्पक एक्सप्रेस मधील एका चहा विक्रेत्याने डब्यात आग लागल्याचे सांगीतल्याने इतर प्रवासी घाबरले, आणि त्यांनीही इतर प्रवाशांना आग डब्यात आग लागल्याचे सांगितले. यावेळी जनरल डब्यात आणि लगतच्या डब्यात गोंधळ आणि घबराट पसरली. तसेच अलार्म चैन पुलिंग (ACP) झाल्याने गाडी थांबली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवार दि २३ रोजी सांगितले की, जळगाव रेल्वे अपघात हा पुष्पक एक्सप्रेसमध्ये एका चहा विक्रेत्याने आग लागल्याच्या “निव्वळ अफवेमुळे” घडला. पुण्यात पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “पॅन्ट्रीमधील एका चहा विक्रेत्याने डब्यात आग लागल्याची ओरड केली. उत्तर प्रदेशातील श्रावस्ती येथील दोन प्रवाशांनी हा आवाज ऐकला आणि त्यांनी खोटा अलार्म इतरांना सांगितला, ज्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि घाबरलेल्या प्रवाशांनी स्वतःला वाचवण्यासाठी बोगीतून उड्या मारल्या. यावेळी बेंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने काही प्रवाशांना चिरडले. अधिकाऱ्यांनुसार, या अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला आणि १५ जण जखमी झाले, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मृत्यू झालेल्या १२ जणांपैकी १० जणांची ओळख पटली असून अफवा पसरवणारे दोन प्रवासी या घटनेत जखमी झाले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
