जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारत हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याचे साधन म्हणजे शेती उद्योगाकडे बघितले जाते. अजूनही शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करीत आहे त्याला नैसर्गिक फटका बसला की तो नैराश्याच्या गर्तेत अडकला जातो ही वस्तुस्थिती समाजात आहे. याउलट परिस्थिती जैन इरिगेशनच्या जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार या प्रदर्शनात बघायला मिळत आहे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड मिळाली आणि चांगले मार्गदर्शन मिळाले तर शेतकऱ्यांच्या जीवनात चैतन्य आल्याशिवाय राहणार नाही. हायटेक स्मार्ट शेतीचा मूलमंत्र देणाऱ्या या जैन हिल्स वरील कृषिमहोत्सवात शेतकऱ्यांसह प्रत्येकाने भेट दिली पाहिजे असे आवाहन जळगाव उपविभागाचे डाकघर अधिक्षक एस.एस. म्हस्के यांनी केले आहे.
जैन हिल्स वरील कृषी संशोधन प्रात्यक्षिक केंद्रावर सुरू असलेल्या कृषिमहोत्सवाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. दि.१४ जानेवारी २०२५ पर्यंत हा महोत्सव आहे. सौर कृषी पंप, वेगवेगळ्या वातावरणाला अनुसरुन पाईप, ठिबक तंत्रज्ञान, पाणी निचरा करण्याची पद्धती, फळलागवड पद्धत जी कमी जागेत जास्त उत्पन्न देणारी ठरणारी अशी अतिसघन आंबा लागवड पद्धत, त्यासोबतच हळद, आले, लसूण, कांदा, मिरची या मसाल्यापिकांसह टॉमोटो, बटाटा पिकांसह पपई, केळी, डाळिंब, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा, पेरू, सिताफळ, लिंबू या फळ बागांमध्ये ठिबक व स्प्रिंकलर्स चा वापरातून शाश्वत निर्यातक्षम उत्पादन कसे घेता येते हे प्रयोग येथे पाहता येत आहे. हे फक्त प्रयोग नसून ते शेतकऱ्यांच्यासह भारताच्या अर्थव्यवस्थेला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. या कृषिमहोत्सवात डाक विभागाचासुद्धा स्टॉल आहे त्यालाही भेट देण्याचे आवाहन एस.एस. म्हस्के यांनी केले आहे.