वास्तव पोस्ट l मुंबई : येथील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडवर ७ धावांनी थरारक विजय मिळवत फायनलमध्ये दमदार प्रवेश केला. या उच्च धावसंख्येच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ७ बाद २५३ धावांचा भक्कम डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडने शेवटपर्यंत झुंज दिली, मात्र भारतीय गोलंदाजांनी निर्णायक क्षणी अचूक मारा करत सामना आपल्या बाजूला वळवला.
उत्तरार्धात २५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. फिल सॉल्ट फक्त ५ धावांवर बाद झाला. जोस बटलरने काही आक्रमक फटके मारले, पण तोही २५ धावांवर माघारी परतला. कर्णधार हॅरी ब्रुक ७ धावांवर बाद झाला, तर टॉम बँटनने १७ धावा केल्या. यानंतर जेकब बेथल आणि विल जॅक्स यांनी डाव सावरत इंग्लंडला सामन्यात परत आणले. जॅक्सने ३५ धावा करत महत्त्वपूर्ण योगदान दिले, तर बेथलने दमदार शतक झळकावून इंग्लंडला विजयाच्या अगदी जवळ नेले. मात्र शेवटच्या क्षणी भारतीय संघाने दडपण कायम ठेवत इंग्लंडचा डाव रोखला आणि सामना ७ धावांनी जिंकला. भारतीय गोलंदाजांमध्ये हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ आणि १ विकेट घेतल्या, तर वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

संजू सॅमसनची वादळी खेळी
दरम्यान नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, पण भारताच्या फलंदाजांनी त्याचा फायदा घेत मोठी धावसंख्या उभारली. अभिषेक शर्मा ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसन आणि इशान किशन यांनी ९६ धावांची महत्त्वाची भागीदारी करत डाव मजबूत केला. सॅमसनने ८ षटकार आणि ७ षटकार खेचत शानदार ८९ धावांची खेळी केली, तर इशान किशनने ३९ धावा केल्या. त्यानंतर शिवम दुबेने ४३ धावा करत आक्रमक खेळी केली. कर्णधार सूर्यकुमार यादव ११ धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्याने २७ धावा केल्या, तर तिलक वर्माने २१ धावांचे योगदान देत भारताची धावसंख्या २५३ पर्यंत पोहोचवली.
भारत सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये
या विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने फायनल गाठत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून जेतेपद पटकावले होते. आता २०२६ मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली आहे.
आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून क्रिकेट चाहत्यांना आणखी एका रोमांचक सामन्याची प्रतीक्षा लागली आहे. चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अंतिम सामन्यासाठी तिकिटांची विक्री वेगाने सुरू आहे, आणि स्टेडियम पूर्ण भरलेले असेल अशी अपेक्षा आहे.

