Headlines
Home » आंतरराष्ट्रीय » न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत भारताने राखले विश्वविजेतेपद; मायदेशात रचला इतिहास

न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत भारताने राखले विश्वविजेतेपद; मायदेशात रचला इतिहास

वास्तव पोस्ट l अहमदाबाद : येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज क्रिकेटचा नवा इतिहास लिहिला गेला. ८६,००० हून अधिक चाहत्यांच्या साक्षीने आणि ‘भारत माता की जय’च्या गगनभेदी जयघोषात टीम इंडियाने टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी दणदणीत पराभव केला. याच मैदानावरील २०२३ च्या पराभवाच्या जखमेवर विजयाची फुंकर घालत भारताने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी२० क्रिकेट विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.

फलंदाजांचा धुमाकूळ : संजू आणि अभिषेकचे वादळ

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. २० षटकांत ५ बाद २५५ धावा करत भारताने टी२० वर्ल्ड कप फायनलमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित केला. संजू सॅमसन ४६ चेंडूंत ८९ धावा (५ चौकार, ८ षटकार), अभिषेक शर्मा २१ चेंडूंत ५२ धावा चोपत झंझावाती सुरुवात करून दिली. इशान किशनने २५ चेंडूंत ५४ धावा ठोकल्या. तर शिवम दुबे केवळ ८ चेंडूंत नाबाद २६* धावा  खेचत अखेरच्या षटकांत फिनिशिंग टच दिला. न्यूझीलंडकडून जेम्स नीशमने ३ बळी घेतले, मात्र भारतीय फलंदाजांच्या आक्रमणापुढे इतर गोलंदाज हतबल दिसले.

गोलंदाजीचा वार : बुमराह आणि अक्षरचा भेदक मारा

प्रत्युत्तरात २५६ धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे किवी फलंदाज टिकू शकले नाहीत. टिम सेफर्टने ५२ धावांची खेळी करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, तर शेवटी सँटनर ने फटकेबाजी केली.

भारताकडून जसप्रीत बुमराहने १५ धावा देत ४ बळी घेतले. त्याला त्याच्याया कामगिरीमुळे सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अक्षर पटेलने आपल्या फिरकीच्या जोरावर २७ धावा देत ३ बळी घेतले. वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी एक एक गडी बाद केले. न्यूझीलंडचा डाव १९ व्या षटकात १५९ धावांवर आटोपला.

ऐतिहासिक नोंदी

● अशा प्रकारे टी२० वर्ल्ड कपमध्ये सलग दुसरे जेतेपद राखणारा भारत जगातील एकमेव संघ ठरला.
● घरच्या मैदानावर टी२० विश्वचषक जिंकणारी भारत पहिलीच टीम ठरली आहे. या आधी यजमान संघाला विजेते पद मिळवता आले नव्हते.

पुरस्कार: जसप्रीत बुमराह ‘मॅन ऑफ द मॅच’, तर संजू सॅमसन ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्काराचा मानकरी ठरला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!