Home » जळगाव » कोविड योद्ध्यांना कंत्राटी सेवेत सामावून घ्या ; जनसेवा विचारधारा फाऊंडेशनतर्फे महापौर दीपमाला काळे यांना निवेदन

कोविड योद्ध्यांना कंत्राटी सेवेत सामावून घ्या ; जनसेवा विचारधारा फाऊंडेशनतर्फे महापौर दीपमाला काळे यांना निवेदन

वास्तव पोस्ट l जळगाव : आज बुधवार दि.२४ रोजी महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी महानगरपालिका जळगाव यांना जनसेवा विचारधारा फाऊंडेशन जळगाव यांच्यावतीने कोविड १९-काळात कंत्राटी सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विविध विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून समावेश करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

कोविड-१९ महामारी कालखंडात कोविड बाधितांची सुश्रुषा करण्यासाठी रक्ताचे नातेवाईक देखील जवळ येण्यासाठी धजावत नव्हते. आपला देशच नव्हे तर संपूर्ण जगातील लोकं त्यावेळी जीवाचा आकांत करून आपआपल्या परिने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी धडपड करीत होते. अशा जीवघेण्या प्रसंगी भीतीपोटी तसेच लॉकडाउन घोषित झाल्याने कुणीही घराच्या बाहेर निघत नव्हते.

दरम्यान कोविड-१९ बाधितांच्या सुश्रुषेसाठी राज्य शासनाने जनतेला आवाहन केले होते. त्यानुसार कोविड योद्ध्यांनी आवाहनास प्रतिसाद देत आपल्या परिवाराची पर्वा न करत स्वतःचा जीव धोक्यात घालून कोविड काळात कंत्राटी स्वरूपात सेवा बजावली. राज्य शासनाच्या आरोग्य विभागासह अन्य विभागात कंत्राटी स्वरूपात वॉर्डबॉय (कक्षसेवक), बेड सहाय्यक, डॉक्टर, नर्सेस, आया, ॲब्युलस चालक, लॅब असिस्टंट, डाटा एन्ट्री ऑपरेटर, लॅब टेक्निशियन आदींना कोविड काळात काम करून सेवा दिली होती. या सेवेमुळे केंद्र व राज्य शासनाने या कोविड योद्धयांचा सन्मान केला होता.

कालांतराने कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी झाल्यावर कोविडची लाट आटोक्यात आली. हळूहळू स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर या कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. “कोरोना योद्ध्यांचे कार्य व अनुभवानुसार स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्य विभागात मनुष्यबळाची कमतरता असलेल्या ठिकाणी शैक्षणिक अर्हतेनुसार त्यांचा कंत्राटी कर्मचारी म्हणून समावेश करण्याबाबत तसा ठराव जळगाव शहर महानगरपालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात यावा“, अशा आशयाचे निवेदन महापौर दिपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी यांना
देण्यात आले.

याप्रसंगी निलेश बोरा, युवराज सुरवाडे, कुवरसिंग पावरा, रमेश वानखेडे, विनोद सपकाळे, भाग्यश्री चौधरी, प्रतिक्षा सोनवणे, ऐश्वर्या सपकाळे, राजेश सपकाळे आदी कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!