वास्तव पोस्ट l जामखेड : विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक (रोजगार हमी योजना शाखा) येथील सह आयुक्त (रोहयो) यांनी नान्नज ता.जामखेड येथील लाभार्थी अरुण बाबू साठे यांच्या रोहयो अंतर्गत मंजूर वैयक्तिक सिंचन विहिरी प्रकरणी गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांना चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत तसेच केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सदर प्रकरणात पंचायत समिती जामखेड येथील विद्यमान गट विकास अधिकारी (उ.श्रे.) शुभम जाधव यांनी रोहयो अंतर्गत मंजूर वैयक्तिक सिंचन विहिरीस तांत्रिक मान्यता व कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही बेकायदेशीर स्थगिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच वरिष्ठांकडे एकाच स्वरूपाचे व दिशाभूल करणारे अहवाल वारंवार सादर केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
लाभार्थी अरुण बाबू साठे हे अनुसूचित जाती प्रवर्गातील व दुर्बल घटकातील शेतकरी असून त्यांच्या शेतात पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने जमीन पडीक पडण्याची वेळ आल्याचे नमूद करण्यात आले आहे. गेली तीन वर्षे संबंधित कार्यालयात वारंवार पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याची बाबही तक्रारीत मांडण्यात आली आहे.

रोजगार हमी योजना अंतर्गत मंजूर कामास प्रशासकीय/तांत्रिक मान्यता व कार्यारंभ आदेश दिल्यानंतर स्थगिती देणे हे नियमबाह्य असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून, पदाचा गैरवापर व पक्षपाती कारवाईची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सह आयुक्त (रोहयो) विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक, यांनी जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांना किमान अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारी यांची नेमणूक करून व अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमून वस्तुनिष्ठ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या प्रकरणात पारदर्शक व निष्पक्ष चौकशी होऊन लाभार्थ्यास न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
