जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शासकीय तंत्रनिकेत महाविद्यालया समोरील खचलेल्या राष्ट्रीय महामार्गाची ‘साडेसाती काही केल्या सुटेना’ अशी अवस्था झालेली आहे. मागील काही दिवसांपासून ‘वास्तव पोस्ट‘ने महामार्गाच्या सदर स्पॉटवर जाऊन तेथील कार्यपद्धतीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सलग पाच दिवस स्पॉटवर जाऊन तेथील प्रत्यक्ष घटनाक्रम ‘वास्तव पोस्ट’ने मांडला.

सबंधित विभागाच्या एका कर्मचाऱ्याच्या सदर बाब लक्षात आल्याने पहिल्याच दिवसापासूनच कामास सुरवात झाल्याचे दाखवत संबंधित विभागाकडून सुरवातीस वरवर खरडपट्टी करण्यात येऊन निघालेले वेस्टेज मटेरियल तिथेच खचलेल्या भागात टाकण्यात आले. नंतर पुन्हा महामार्गावर अस्तव्यस्त पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याची वेळ आली. अशातच संबंधित विभागाच्या कामाचा दर्जा मात्र चांगलाच घसरल्याचे दिसून आले. प्रचंड वाहतुकीमुळे उडणाऱ्या धूळीच्या लोटमुळे जनतेच्या डोळ्यात मोठ्या प्रमाणात धूळ फेक झाली. त्यानंतर मात्र बुधवार दि.२१ रोजी संध्याकाळी या खचलेल्या भागास उकरुन तेथे कॉन्क्रीट पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम हाती घेतले व रात्री उशीरापर्यंत हे काम पूर्ण झाले. त्यामुळे बुधवारची रात्र तसेच गुरुवारी महामार्गाचा हा भाग वाहतुकीस बंद करण्यात आला होता. मात्र शुक्रवारी या पेव्हर ब्लॉक्स वरुन वाहतुकीस सुरवात झाली, आणि काही तासांतच महामार्गाच्या या वारंवार खचत असलेल्या भागाने आपल्या ठेकेदाराची गुणवत्ता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली.
त्याआधी वास्तव पोस्टने विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देतांना एका जबाबदार कर्मचाऱ्याने इच्छादेवी येथील पेव्हर ब्लॉक्सचा प्रयोग यशस्वी (स्वयं घोषित यशस्वी) झाल्याची पावती देत आता तंत्रनिकेत महाविद्यालया समोरील स्पॉटवर देखील महामार्ग खचण्याची समस्या यापुढे राहणार नाही, असे मोठ्या विश्वासाने सांगितले होते. मात्र ‘चार ते पाचच दिवसांत समस्या जैसे थे होण्याची दाट शक्यता आहे‘ असे ‘वास्तव पोस्ट‘ ने त्याचवेळी कारणांसह संबंधीत कर्मचाऱ्यास स्पस्ट केले होते.

‘वास्तव पोस्ट‘ने केलेल्या भाकितानुसार पेव्हर ब्लॉक्स च्या कामावर खरोखरचं चार पाच दिवसांत नव्हे तर काही तासांतच पाणी फेरले गेले, आणि महामार्ग पेव्हर ब्लॉक्ससह खचून पुन्हा एकदा खड्डयात जाऊन जनतेच्या टॅक्स रूपी पैशाचा या वेळेस देखील चुराडा झाला. त्याचबरोबर संबंधित खात्याच्या कामाचे पितळ देखील पुन्हा एकदा उघडे पडले आहे. याआधी ‘पैसा खड्डयात न टाकता गुणवत्ता राखून रस्त्याच्या कामात टाका‘ या मथळ्याखाली ‘वास्तव पोस्ट‘ने प्रकाश देखील टाकला होता.
आकाशवाणी चौकातही हे पेव्हर ब्लॉक्स खचून त्याठिकाणी महामार्गावर मोठा शिवाय खोल खड्डा तयार झाला आहे. मुळात हे सर्कलच वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे होणाऱ्या अपघातांवरुन बऱ्याच वेळा दिसून आले आहे. त्यात भरीसभर म्हणजे तेथील निघालेले पेव्हर ब्लॉक्सही आता वाहतुकीस अडथळा ठरत असल्याने ते पेव्हर ब्लॉक्स अक्षरशः उचलून बाजूला सर्कलच्या कठड्यावर रचून ठेवण्यात आले आहेत. इच्छादेवी चौकाची देखील परिस्थिती यापेक्षा काही वेगळी नाही.
असो… अशा प्रकारे शहरातून जाणाऱ्या या महामार्गाची साडेसाती अजूनही काही सुटत नसून, प्रत्येक वेळी वेगवेगळी पद्धत या खचलेल्या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी वापरली जात आहे. आता यापुढे तेवढ्या भागाचे कॉन्क्रीटीकरण केले जाते, की अजुन काही वेगळी अजब पद्धत बघायला मिळते ते पुढील काही दिवसांत दिसणारच आहे.
(क्रमशः)
