जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : सिकलसेल आजाराने पीडित असलेल्या रावेर तालुक्यातील या पीडित रुग्णाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात योग्य सुविधा मिळत नसल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना फोन लावत आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती फोनवर दिली असता जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांनी रुग्णाचे सर्व ऐकुन घेतले, मात्र त्यांनी कोणतीही मदत न करता साधी प्रतिक्रियाही दिली नाही व अनेकवेळा फोन कट केलेत. यामुळे रुग्णाचे नातेवाईकांत प्रचंड संताप पाहायला मिळत होता.
जळगाव जिल्ह्यातील सिकलसेल रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अशा या बेजबाबदार वागण्याने डॉक्टर सचिन भायेकर यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया जिल्हाभरातुन येत आहेत. रावेर तालुक्यातील या रुग्णास अनेक वर्ष लोटून देखील अद्यापपर्यंत कोणतेही शासकीय सिकलसेल ओळखपत्र दिले नसल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याला अडचणीचा सामना करावा लागत होता.
या घटनेची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे वैद्यकीय सेलचे महानगराध्यक्ष नरेंद्र सपकाळे यांना माहिती मिळताच त्यांनी रुग्णालय गाठत रुग्णाची भेट घेतली. तसेच तेथील संबंधित डॉक्टरांसोबत चर्चा केली व रुग्णासाठी त्वरित रक्ताची गरज ओळखत रुग्णालयाचे अधिष्टाता डॉक्टर ठाकुर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी देखील सर्व माहिती घेऊन रुग्णास योग्य उपचार करण्याची कार्यवाही सुरु केली. मात्र या घटनेच्यानिमित्ताने आरोग्य प्रशासनास जाग केव्हा येणार हा प्रश्न उभा आहे.
