जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनात आज दि.२ मंगळवार रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे उपस्थितीत रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न झाली. यात शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील होणाऱ्या सततच्या अपघातांवर उपाययोजनांबाबत चर्चा झाली. यावेळी अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागांनी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच मागील आठवड्यात झालेल्या दोन्ही अपघातास ठेकेदारास जबाबदार धरत त्याचेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.

दरम्यान वास्तव पोस्टने “जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील अपघातांना नेमके जबाबदार कोण ?”
या दि.२९ ऑगस्ट रोजी दिलेल्या मथळ्याखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्ह्यातील खराब व अर्धवट रस्त्यांमुळे झालेल्या अपघातास जबाबदार ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याबाबतचे दिलेले आदेश यावर प्रकाश टाकून अशाच प्रकारचे निर्देश जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाबाबत का देऊ नये ? असा प्रश्न उपस्थित केला होता.
जळगाव येथील महामार्गावर गेल्या आठवड्यात झालेल्या दोन अपघातांना जबाबदार असलेल्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस निरीक्षक यांना दिल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी माहीती दिली. सदर दोन्ही अपघात हे महामार्गावर वेगवेगळ्या विभागात झाले असल्याने दोन्ही ठिकाणी ठेकेदारावर गुन्हे नोंदविण्याचे आदेश देण्यात आले.


दरम्यान समांतर रस्त्याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सोनावणे यांना दि.२६ तारखेच्या बैठकीचेही पत्र देण्यात आले होते. त्यानुसार काही टेंडर झालेले असून काही रिकॉल करून लवकरच समांतर रस्त्याचे काम देखील पूर्ण केले जाईल असे अभियंत्याकडून सांगण्यात आल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले.
दरम्यान आजच्या या बैठकीत बायपास रस्त्यावर देखील चर्चा झाली. त्यात संबंधीत विभागाने मार्च महिन्याच्या आत बायपास चे काम पूर्ण करावे, तसे एफिडेविट देखील त्यांनी करून द्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बैठकीला पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आरटीओ आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महामार्गाच्या कामकाजाबाबत संबंधित विभाग ठेकेदारांना रस्त्यांचे मेंटेनन्स वेळेवर करावे तसेच महामार्गावरील दिव्यांबाबत असलेल्या व इतर सगळ्या गैरसोई दूर करण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या.
