मुंबई ( वास्तव पोस्ट ) : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने दि.६ ऑक्टोबर रविवार रोजी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर टाटा यांनी सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्वत: ट्विट करत आपल्या प्रकृतीची मीहिती दिली होती.
“माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही”, असं रतन टाटा म्हणाले होते.अखेर बुधवारी रात्री रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. शेवटी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रतन टाटा यांनी आपल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विचार केला. ते आपल्या कंपन्यांमधील कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या थेट संपर्कात जाण्याचा प्रयत्न करायचे. त्यांनी अनेकदा कर्मचाऱ्यांशी तसा संवादही साधला. ते कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रचंड काम करायचे. त्यांच्या प्रेमामुळे कर्मचारीदेखील टाटा यांच्यावर तितकाच प्रेम करायचा. टाटा यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्य आणि उद्योग क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. रतन टाटा एक माणूस म्हणून एक श्रेष्ठ व्यक्तीमत्व होते.
रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. १९९१ मध्ये रतन टाटा हे टाटा समूहाचे अध्यक्ष झाले आणि शंभर वर्षांपूर्वी त्यांच्या आजोबांनी स्थापन केलेल्या टाटा समूहाचे ते २०१२ पर्यंत अध्यक्ष होते. त्यांनी १९९६ मध्ये दूरसंचार कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेसची स्थापना केली. आणि २००४ मध्ये आयटी क्षेत्रातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही कंपनी सार्वजनिक केली. २००९ मध्ये, रतन टाटा यांनी मध्यमवर्गीयांसाठी जगातील सर्वात स्वस्त कार उपलब्ध करून देण्याचे वचन पूर्ण केले.१ लाख रुपये किंमतीची टाटा नॅनो ही मध्यमर्गीयांसाठीची कार त्यांनी बाजारात आणली होती.
रतन टाटा हे टाटा समूहाचे १९९१ ते २०१२ आणि २०१६ ते २०१७ या काळात दोनदा अध्यक्ष होते. त्यांनी कंपनीच्या दैनंदिन कामकाजातून माघार घेतली असली तरी, त्यांनी चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून काम चालू ठेवले. त्यांच्या दुःखद निधानामुळे सर्व थरातून दुःख व्यक्त केले जात आहे.
