कोल्हापूर ( वास्तव पोस्ट ) : महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे गुन्हे निकाली काढून आरोपींचा तातडीने शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करा, महिलांची फसवणूक करणाऱ्यांची साखळी तोडून काढा, पोलीस यंत्रणांनी महिला अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यांमागील कारणांचा शोध घ्यावा, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. कोल्हापूर दौऱ्यांतर्गत, कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमधील महिला अत्याचार विषयक गुन्ह्यांचे प्रतिबंध करण्याबाबत केलेली कार्यवाही व उपाययोजना संदर्भात डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवार, ६ जानेवारी रोजी बैठक पार पडली.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, लहान मुलींवर होणारे अत्याचार टाळण्यासाठी शाळामध्ये “गुड टच बॅड टच ” या संदर्भात प्रशिक्षण द्यावे, प्रशिक्षीत मुलींचे गट तयार करुन या संदर्भांत जनजागृती करावी. “अत्याचारग्रस्त पीडितांची वैद्यकीय तपासणी अथवा उपचारासाठी स्वतंत्र कक्षाची सोय करावी. तसेच पिडीतांना कोर्टात घेवून जातानाही योग्य ती दक्षता घेण्यात यावी.
“पॉक्सोअंतर्गत लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात गुन्ह्याचा तपास करताना पिडीतेची ओळख गुप्त राहील, तसेच पिडीतांनी व त्यांच्या कुटुंबियांना कोणताही त्रास होवू नये याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी शेवटी दिल्या.
या बैठकीस आमदार राजेश क्षीरसागर, कोल्हापूर परिक्षेत्राचे प्र. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई, शौमिका महाडिक प्रत्यक्ष तर सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, साताराचे पोलीस अक्षीक्षक समीर शेख, पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
