जळगाव ( वास्तव पोस्ट ) श. प्र. संदीप सोनवणे। शहरातील इच्छादेवी चौक परिसरात वाहनात अवैधरीत्या गॅस भरत असतांना सिलेंडरचा स्फोट झाल्याने लगलेल्या आगीत ओमनी गाडी व संबंधित दुकान जळून खाक झाले. या दुर्घटनेत १० जण जखमी झाले आहेत. तसेच प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरुन याठिकाणी असलेली बुलेट दुचाकी चक्क आकाशात फुटबॉलसारखी उडाली. या घटनेमुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?
जळगावात इच्छादेवी चौक परिसरात एका ठिकाणी अवैधरित्या ओमीनीत गॅस भरत असताना सिलेंडरचा स्फोट झाल्याने ओमीनी गाडी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील ७ व्यक्ती गॅस भरणारे २ जण आणि वाहन चालक असे १० जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी बेकायदेशीररित्या तसेच अवैध पद्धतीने वाहनात गॅस भरला जात होता, त्यातून ही गंभीर घटना घडली आहे.
विशेष म्हणजे दुर्घटना घडली त्या ठिकाणाहुन हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असूनही याठिकाणी अवैधरित्या वाहनांत गॅस भरण्यात येत होता. या प्रकारास पोलीसांचा आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे. या दुर्घटनेत गंभीररित्या भाजलेल्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संपूर्ण ओमनी, दूचाकी तसेच दुकान पूर्णपणे जळून खाक झाले होते.

या स्फोटामध्ये एक बुलेट दुचाकी चक्क आकाशात फुटबॉल सारखी उडाल्याची माहिती सुद्धा प्रत्यक्षदर्शनी दिली आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. संबंधित परिसरात एमआयडीसी पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध पद्धतीने वाहनात गॅस भरण्याचा उद्योग सुरू असल्याची माहिती मिळाली असून, या घटनेनंतर नागरिकांकडून संबंधितांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
