जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जानेवारी २०२५ महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. २६ जानेवारीपर्यंत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते, त्यानुसार लाडकी बहीण योजनेत आता महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जाणार आहे.
त्यामुळे येत्या दोन दिवसांत सर्व लाभार्थी महिलांना पैसे दिले जातील. मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे दिले जात होते. त्यानंतर आता या महिन्यातदेखील शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होणार आहेत.
२४ जानेवारी २०२५ पर्यंत १.१० कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून, २६ जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार असल्याचे अदिती तटकरे यांनी आपल्या X या सामाजिक माध्यामातून सांगितले आहे
