जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महीन्यात काही लोक मकर संक्रांतीचे निमित्तीने तसेच काही लोक एक छंद म्हणुन पतंग उडवतात. बऱ्याच ठिकाणी पतंगबाजी मध्ये वापरण्यात येणारा दोरा हा नायलॉन पासून बनलेला असतो. सदर नायलॉन मांजा हा इमारतीमध्ये तसेच झाडांमध्ये अडकतो.
सदर मांजा हा सहजासहजी तुटत नसल्याने परिणामी नायलॉन मांजा रस्त्याने येणारे जाणारे मोटार सायकल चालक तसेच सायकलवरुन जाणारे विद्यार्थी यांचे गळ्यात अडकुन नागरीक व विद्यार्थी जखमी होण्याचे तसेच सदर मांजामुळे जीव जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच सदर मांजामुळे पक्षी व प्राण्यांची जिवीत हाणी होत असुन सदर मांजा हा अविघटनशील असल्याने पर्यावरणाचा देखिल ऱ्हास होत आहे.
पतंग उडवतांना नॉयलॉन मांजाचा वापरामुळे होणाऱ्या दुर्घटनांना प्रतिबंध होणेसाठी मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचे Suo Moto PIL क्र. 08/2020 चे आदेशानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. मा. जिल्हा दंडाधिकारी जळगाव यांचेकडील आदेश क्रमांक दंडप -1/ एसआर/2024/03 दिनांक 10/01/2024 अन्वये नायलॉन मांजा विक्री प्रतिबंधीत केलेली आहे. त्याचप्रमाणे पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करणेबाबत पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी सुचना केल्या होत्या.
त्यानुसार दि.१३ जानेवारी २०२५ आणि दि.१४ जानेवारी २०२५ रोजी पतंग विक्रीसाठी नायलॉन मांजा विक्री करणारे व हाताळणारे इसमाविरुध्द कारवाईची मोहीम राबवण्यात आली. सदर कारवाई दरम्यान भा. न्या. संहीता कलम 110,223 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 5,15 अन्वये “सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न” या सदराखाली ५ गुन्हे दाखल करण्यात आलेले असुन सदर गुन्ह्यातील नायलॉन मांजा विक्री करणारे इसम नामे मयुर दत्तु भोई (वय-२३ वर्षे ) राहणार सदगुरुनगर (अयोध्यानगर) जळगाव, भुषण गजानन बेलेकर (वय-२४ वर्षे) राहणार डि.एन.सी. कॉलेज जवळ जळगाव, अफवान निहाल खान वय-२४वर्षे राहणार काट्याफाईल, परवेझ शेख शफी शेख ( वय-२४वर्षे ) राहणार काट्याफाईल, दर्शन संजय शिंपी ( वय-१९ वर्षे ) राहणार आशाबाबनगर, गितेश भरत रौंदाने ( वय १८ वर्षे ) राहणार आशाबाबानगर, प्रतिक ज्ञानेश्वर पांडुळे ( वय-२१ वर्षे ) राहणार रामेश्वर कॉलनी, तुषार सुनिल माळी ( वय २३ वर्षे ) राहणार विठोबानगर जुना खेडी रोड जळगाव अशा ८ इसमांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सदर इसमांकडून ११ नायलॉन मांजाच्या चक्री जप्त करण्यात आलेल्या आहेत. पुढील २ दिवसात देखिल सदर मोहीम अशाच प्रकारे राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली शनिपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली.