पुणे | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सामान्य माणसाला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची कल्पना पुढे आली. कोविड संकटाच्या काळात वैद्यकीय सुविधांचे महत्व लक्षात आले. त्यामुळे गेली दोन वर्षे वैद्यकीय सुविधा वाढविण्यावर भर देण्यात आला. या रुग्णालयातील १० टक्के खाटा मोफत आणि ६ टक्के खाटा शासकीय दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाणेर येथेही ५५० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशात प्रथमच जर्मनी आणि नेदरलँडच्या आर्थिक सहकार्याने वारजे येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे. नेदरलँडच्या विमा कंपनीने जोखिमीची हमी घेतली असल्याने सर्वदृष्टीने फायदेशीर असा हा प्रकल्प आहे. रुग्णालयात नेदरलँडने मान्य केलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधा असतील. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास पुण्यासह महाराष्ट्रात खाजगी भागिदारीतून अशा आरोग्य सुविधा उभारता येतील, असे त्यांनी सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, नव्याने उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयात आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना चांगली वैद्यकीय सेवा मिळेल, व रुग्णालयात सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवा दिली जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनिल कांबळे (दूरदृष्यप्रणालीद्वारे), पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार आदी उपस्थित होते.
