
महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यासंगी विद्वान होते. त्यांचे विचार चिरंतन राहिले आहेत. शाश्वत विचारांची शिदोरी देणा-या या युगपुरुषासमोर जगातील सर्व लोक आदराने नतमस्तक होतात. सामाजिक विषमतेविरुद्ध यशस्वी लढा देऊन हजारो वर्षापासून अंधारात गडप झालेल्या मूक समाजाला जागृत करण्याचे अलौकिक कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. कुत्र्या- मांजरापेक्षाही हीन जीवन जगणाऱ्या अखिल वंचित समाजाला “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ” हा मूलमंत्र त्यांनी दिला. डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक विचारात स्त्री शिक्षण, जातीसंस्था आणि धर्म इ. चा समावेश होतो. स्त्रियांना समाजात समान दर्जा व चांगली वागणूक मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. स्त्रियांना शिक्षण मिळाल्यास संपूर्ण कुटुंबाचा विकास होतो. व्यक्तीचे जीवन सुधारावे व बाळाला नैतिक वळण लावण्यासाठी स्त्रियांना शिक्षणाची आवश्यकता आहे. स्त्रियांचे कार्यक्षेत्र चूल व मूल एवढे मर्यादित नसून ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी’ असा संकुचित विचार न करता जिच्या हातात पाळण्याची दोरी आली नाही अशा सुद्धा स्त्रियां आहेत. अखिल स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांच्यात जागृती निर्माण केली पाहिजे. जातीव्यवस्थेने स्त्रियांना आणि शुद्रांना हिणवले. स्त्री ही घरातील संस्कारकर्ती. तिचा आत्मविश्वास बळावला पाहिजे. ती कर्तव्याच्या भावनेला जागली पाहिजे, ती खंबीरपणे उभी राहिली पाहिजे. प्रगतीच्या दिशेने – झेपावत गेली पाहिजे. तिच्यातील न्यूनगंड निरास पावला पाहिजे, असे डॉ. आंबेडकरांना वाटायचे.
नागपूरच्या दलित वर्गीय स्त्री परिषदेत ते म्हणाले होते- स्वच्छ रहा, दुर्गुणापासून दूर रहा, मुलांना शिक्षण द्या. त्याच्या मनामध्ये महत्त्वाकांक्षा जागृत करा तुम्ही जगात मोठेपणा मिळवू शकाल असे विचार त्यांच्या मनावर बिंबवा. त्यांच्या मनातून न्यूनगंडांची महत्वाची भावना काढून टाका.लग्न करण्यास घाई करू नका, लग्न ही एक जबाबदारी असते. तुमची मुले ती जबाबदारी आर्थिकदृष्ट्या पेलण्यास समर्थ झाल्याविना ती त्यांच्यावर लादू नका. लग्न करतील, त्यांनी हे लक्षात ठेवावे की अनेक मुले जन्माला घालणे, हे एक पाप आहे. आपल्यापेक्षा जीवनात वरच्या पातळीवर प्रत्येक मुलाला आरंभ करून देणे हे आईबापाचे कर्तव्य आहे.” स्त्री शिक्षणाशिवाय राष्ट्रोन्नती घडून येणार नाही. म्हणून स्त्री- शिक्षणाला डॉ. आंबेडकरांनी महत्त्वाचे मानले.अस्पृश्यता हा हिंदू समाजावर लागलेला एक कलंक आहे. ह्या धर्मात पशूला श्रेष्ठ आणि मानवाला अस्पृश्य लेखण्यात येते तो धर्म कसा असू शकतो ? ऋग्वेदातील पुरुष सुक्ताने ब्राह्मण मुखापासून, क्षत्रीय बाहूपासून, वैश्य मांड्यापासून आणि शुद्र पायापासून उत्पन्न झाल्याचा काव्यमय निर्वाळा दिला आणि हजारो वर्षांपासून शूद्रांची परवड होत राहिली. एका वर्गाने विद्या शिकावी दुस-याने शस्त्र धरावे,तिस-याने व्यापार करावा आणि चौथ्या वर्गाने वरील तीनही वर्गाची सेवा करावी. एका वर्गाला ज्ञानसंपादनाचा मार्ग मोकळा, पण दुस-यांनी अन्यायाच्या गर्तेत पिचत पडावे, एकाने स्वरक्षणासाठी हातात शस्र धरावे, दुसऱ्याने निःशस्त्र रहावे. काहींनी व्यापार करावा आणि बाकीच्यांनी आपल्या उपजीविकेसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे असा हा धर्म सांगत असेल तर आधार हा धर्म नसून स्वार्थपरायणताच आहे. ही विषमता बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नव्हती.
स्त्री-पुरुष हा भेद नैसर्गिक आहे. पण अस्पृश्यता ही एका वगनि स्वत:च्या भल्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे. त्यासाठी. त्यांनी १९२७ ला महाडचा सत्याग्रह केला. वास्तविकता त्या चवदार तळ्याच्या पाण्याने अस्पृश्यांना अमरत्व प्राप्त होणार नव्हते. ज्याठिकाणी गाय, कुत्रे, बैल, स्पृश्य पाण्याला स्पर्श करू शकतात. तिथे अस्पृश्य नावाच्या माणसाला मज्जाव कसा? असा प्रतिप्रश्न बाबासाहेबांनी धर्ममार्तंडांना केला. त्यासाठी त्यांनी १९३० रोजी काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला. आणि सामाजिक विषमतेचे मूळ असणा-या मनुस्मृतीचे दहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक-एक जात म्हणजे एक-एक मजलाच होय. पण गोष्ट लक्ष्यात असू द्या की या मजल्यांना शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुस-या मजल्यावर जाण्यास मार्ग नाही. ज्या मजल्यात त्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला इसम मग तो कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही. वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची कोणाची प्राज्ञा नाही अस्पृश्यांचे स्थित्यंतर आणि मन्वंतर व्हायचे असेल तर त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला हवी. डॉ. बाबासाहेबांनी मूकसमाजाला जागे केले, विद्रोहाचे शस्त्र आणि स्वाभिमानाची ज्योत प्रदान केली. १९३५ च्या येवला येथील समेत बाबासाहेब गरजले. ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. धर्म हा मनुष्याकरिता आहे. मनुष्य धर्माकरिता नाही जो धर्म तुम्हास म्हणून माणूस ओळखावयास तयार नाही. जो धर्म तुम्हास पाणी मिळू देत नाही, तो धर्म या संज्ञेला अपात्र आहे. जो धर्म तुम्हाला शिक्षण मिळू देत नाही. तुमच्या ऐहिक उत्कर्षाच्या आड येतो. तो धर्म या संज्ञेला पात्र नाही. जो धर्म आपल्या अनुयायांना आपल्या धर्मबांधवांशी माणुसकीने वागण्यास शिकवत नाही, तो धर्म नसून रोग आहे, जो धर्म अज्ञान्यांना अज्ञानी रहा, निर्धनांना निर्धन रहा असे म्हणतो, तो धर्म नसून शिक्षा आहे. अशा धर्मावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वास नव्हता. स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देणाऱ्या भ. बुद्धांचा धम्म डॉ. आंबेडकरांनी स्वीकारला. सामाजिक विषमतेविरुद्धचा लढा देऊन समता प्रस्थापित करण्यासाठी हा संघर्ष होता.
©प्रा.डाॅ. सत्यजीत साळवे.
(प्रमुख, मराठी विभाग)
डॉ.अण्णासाहेब जी. डी.बेंडाळे
महिला महाविद्यालय, जळगाव
मो. ९८२३३८०९७०
