Headlines
Home » सरकारी योजना » “आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड” योजनेस रु.४० लाख निधीस मान्यता

“आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड” योजनेस रु.४० लाख निधीस मान्यता

Backyard Planting Scheme : राज्यातील आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना २०२४-२५ मध्ये राबविण्यास ४० लाखाच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबत शासननिर्णय पारीत करण्यात आला आहे.

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत राज्यातील १४ जिल्हयांतील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांना पौष्टिक आहार पुरविण्यासाठी, आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत पौष्टीक भाजीपाला व फळांची निवड करुन त्याची लागवड करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी “आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड” ही योजना राज्यात सन २००३-०४ पासून राबविण्यात येत आहे.

यानुसार राज्यातील ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगांव, अहमदनगर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती व गोंदिया या १४ जिल्हयातील आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीची योजना सन २०२४-२५ मध्ये राबविण्यासाठी चाळीस लाख रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असुन याबाबत शासन निर्णय पारित करण्यात आला आहे.

या शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आलेल्या रक्कमेचे कोषागारातून आहरण व वितरण करण्याकरिता संचालक फलोत्पादन यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले असून आयुक्तालय स्तरावरील खर्चासाठी सहाय्यक संचालक, लेखा-१ यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच, विभागीय कृषी सहसंचालक स्तरावर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी, जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभाग स्तरावर उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित केले आहे.

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून फक्त अनुसूचित जमाती च्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल याची दक्षता घेण्यात यावी. असे शासन निर्णयातील नमुद करण्यात आले आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०७२६१११०३७२२०१ असा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!