Headlines
Home » राजकीय » अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा मातंग समाजाचे नेते सचिन साठे उद्धव सेनेत !

अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा मातंग समाजाचे नेते सचिन साठे उद्धव सेनेत !

मुंबई | दि. १० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होत नाहीये. पक्ष फुटला, निष्ठावंत पळाले, संघटनेला उतरती कळा लागली, मात्र नव्या दमाच्या, जोशाच्या चेहऱ्यांनी उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत केलेत. अशातच आता अण्णा भाऊ साठेंचे नातू सचिन साठें यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला असुन मशाल हाती घेतली आहे. अण्णा भाऊ साठेंच्या नातवाचा पाठिंबा मिळवून उद्धव ठाकरे यांना मातंग समाजाची ताकद मिळणार आहे.

सचिन साठे हे अण्णा भाऊ साठेंच्या सामाजिक आणि प्रबोधन चळवळीचा वारसा घेऊन राजकारणात उतरलेत.२०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार केला होता. मात्र सचिन साठेंच्या वाट्याला उपेक्षेशिवाय काहीच आले नाही, म्हणून त्यांनी स्वतंत्र वाटचाल सुरु केली. आता मात्र मातोश्रीचा भक्कम आधार सचिन साठे यांना मिळाला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय तसेच सामाजिक लढाईत ठाकरे आणि साठे या दोन्ही घराण्याला मोठा इतिहास आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत सचिन साठे आल्याने मातंग फॅक्टरचा कितपत फायदा उद्धव सेनेला होईल हे येत्या काही दिवसांत कळणारच आहे. मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या शिर्डी, सोलापूर, अमरावती, रामटेक आणि लातूर या ५ लोकसभा मतदारसंघात मातंग समाज निर्णायक ठरु शकतो. तसेच विधानसभेच्या २९ राखीव मतदारसंघामध्ये मातंग मतदारांची टक्केवारी अधिक आहे. त्याचप्रमाणे अनेक खुल्या लोकसभा, विधानसभा मतदार संघातही मातंग समाजाची ताकद दिसून येते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!