जळगाव पोलीसांसाठी २४ नवीन चारचाकी गाड्या
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : २ कोटी २५ लाख रुपयांच्या निधीतून २४ नवीन चारचाकी वाहने पोलीस दलाच्या सेवेत देताना आनंद होत असून या वाहनांमुळे डायल ११२ आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम होईल आणि गस्त घालण्याची क्षमता वाढेल. यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीला गती मिळेल. आपल्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळात पोलीस दलासाठी चारचाकी व दुचाकी वाहने, पोलीस ठाण्यांची उभारणी आणि तांत्रिक सुधारणा यावर सातत्याने भर दिला आहे. केवळ वाहने देणे हा उद्देश नसून पोलिसांना आधुनिक संसाधने, योग्य प्रशिक्षण आणि आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पोलिसांची ताकद म्हणजे समाजाची सुरक्षा आहे. त्यामुळे जनतेने पोलिसांचा सन्मान करावा आणि त्यांना सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

या प्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पोलिसांच्या बळकटीकरणासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. जिल्ह्याची सुरक्षितता अधिक महत्त्वाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी जिल्हा पोलीस दलाच्या बळकटीकरणाबद्दल आनंद व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री संजय सावकारे आणि आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून २४ चारचाकी वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, पोलीस उपअधीक्षक (शहर) संदीप गावित यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
