ASSEMBLY ELECTION 2024 : लोकसभा निवडणूकीनंतर आता सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली आहे. मात्र अजित पवार गटाने भोसरी आणि चिंचवड जागेवर दावा केल्यामुळे महायुतीचे टेंशन वाढले आहे.
पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नुसत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला म्हणावं तसे यश मिळाले नाही. अशातच राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहेत. काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. राजकीय पक्ष प्रमुखांनी आपआपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. अजित पवार गटाच्या नेत्यांनीही विधासभा निवडणुकीसाठी आपले दंड थोपटले आहेत.
विधानसभेत लोकसभेपेक्षा एकदम वेगळं चित्र असेल, असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. पिंपरी चिंचवड शहरापासून त्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात अजित पवार गटाचा बऱ्यापैकी मोठा वाटा आहे. या मतदार संघात अजित पवार गटाची ताकदही मोठी आहे.
दरम्यान महायुतीत चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपकडे असुन भाजपचे दोन विद्यमान आमदार या मतदारसंघात आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने या मतदारसंघांवर आपला दावा ठोकला आहे. या दाव्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
पिंपरीत अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे हे आमदार आहेत. तर भोसरी मतदारसंघात महेश लांडगे आणि चिंचवडमध्ये अश्विनी जगताप हे दोघे भाजपचे विद्यमान आमदार असुन मावळात सुनील शेळके आमदार आहेत. महायुतीत भोसरी आणि चिंचवड मतदारसंघ भाजपकडे असतांनाही अजित पवार गटाने या दोन्ही विधानसभा मतदार संघावर दावा केला आहे.
