नवी दिल्ली | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – रशिया-युक्रेनमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात हैदरबाद, केरळसह गुजराथ येथील तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे या युद्धात मनुष्यबळ पुरवण्याकरीता मानवी तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. लोकांना विशेषतः तरुणांना परदेशात पाठवण्याच्या नावाखाली मानवी तस्करी करणारे एजंट सीबीआयच्या रडारवर आले आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी सीबीआयकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. ७ शहरांमध्ये १० हून अधिक ठिकाणी छापेमारी करून सीबीआयने मानवी तस्करीचं मोठं नेटवर्क उद्ध्वस्त केले आहे. दिल्ली, तिरुवनंतपुरम, मुंबई, अंबाला, चंदीगड, मदुराई, चेन्नईत सीबीआयनं छापे टाकले आहेत.
विदेशात नोकरी लावून देणाऱ्या एजंट्सविरुद्ध गुन्हा दाखल : चांगल्या नोकऱ्यांच्या नावाखाली भारतीय तरुणांना रशिया-युक्रेन युद्धक्षेत्रात पाठवणाऱ्या विविध व्हिसा सल्लागार कंपन्या, एजंट्सविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५० लाख रुपये, आक्षेपार्ह कागदपत्रे, लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, मोबाइल, डेस्कटॉप आदी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जप्त करण्यात आलं आहे. काही संशयितांना विविध ठिकाणांहून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. आतापर्यंत परदेशात पाठवलेल्या पीडितांची जवळपास ३५ प्रकरणे समोर आली आहेत.
परदेशात नोकऱ्या देण्याचे आश्वासन दाखवत हे मानवी तस्कर एक संघटित नेटवर्क म्हणून कार्यरत आहेत. देशातील अनेक तरुणांना एजंटांनी रशियात उच्च पगाराच्या नोकऱ्या देण्याचं आश्वासन देऊन परदेशात पाठवत असतात. हे तस्कर भारतीय नागरिकांना युट्युब, सोशल मीडिया चॅनेलद्वारे तसेच त्यांचा स्थानिक संपर्क, एजंटद्वारे नोकऱ्यांसाठी आमिष दाखवत होते. एजंट लोकांनी काही तरुणांकडून प्रति व्यक्ती ३.५ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना युक्रेन युद्धात लढण्यासाठी पाठवण्यात आले का य्य दिशेने तपास सुरु आहे.
