नागपूर, दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आज विशेषतः युवकांकडून ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जात असताना उपराजधानीत मात्र कोयत्याने वार करून मित्राचा खून करण्यात आला. ही थरारक घटना मानेवाडा चौकाजवळ नाईकनगरात घडली.
सविस्तर वृत्त असे की आरोपी विपीनकुमार गुप्ता याने प्रेयसीच्या प्रेमावर संशय घेत आपलाच मित्र सूरज बिहारी याच्या मानेवर कोयत्याने वार केला त्यात सूरजचा जागीच मृत्यु झाला. हत्याकांडानंतर आरोपी स्वत:हून अजनी पोलीस ठाण्यात पोहचला आणि पोलिसांच्या स्वाधीन झाला. राज्याची उपराजधानीत गुन्हेगारांनी पुन्हा तोंड वर काढले आहे. पोलिसांची दहशत नसल्यामुळेच गुन्हेगारी वाढत असल्याचे बोलले जात आहे. सूरज बिहारी हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर जवळपास २१ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे सूरज बिहारी हा नागपुरातून तडीपार आरोपी होता. मग तो शहरात कसा ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सूरजची आरोपी बिपीनकुमार गुप्ता सोबत मैत्री होती. सूरज आणि बिपीनकुमार दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. काही वर्षापूर्वी कामाच्या शोधात ते नागपुरात आले, दोघेही गुन्हेगारीत सक्रिय होते. बिपीनचे प्रेमप्रकरण सुरु होते आणि त्याच्या प्रेयसीची सूरजशी मैत्री होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहीती नुसार, गेल्या काही दिवसांपासून प्रेयसीसोबत सूरजची वाढलेली जवळीक बघता बिपीनला दोघांवरही संशय होता. बिपीनने प्रेयसीला सूरजसोबत मैत्री तोडण्यास सांगितले. मात्र, मैत्री तोडण्यास तिने नकार दिल्यामुळे बिपीनचे प्रेयसीसोबत जोरदार भांडण झाले होते. तसेच सूरजमुळेच प्रेयसीने आपल्यासोबत अबोला धरल्याचे त्याच्या मनात सलत होते, म्हणून आरोपीने सूरजला नाईकनगर चौकात हा वाद मिटविण्यासाठी बोलावले होते ,पुढील तपास पोलिस करीत आहे .