जळगाव ( वास्तव पोस्ट) : घरात पाल्यांशी बोलताना मनमोकळेपणाने संवाद साधला पाहिजे. महिलांप्रमाणे मुलांमध्येही संवेदनशील मन निर्माण करता आले पाहिजे. त्यासाठी त्यांच्या जडणघडणीसाठी पालकांनी जाणिवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. घरातून मुलांना महिलांविषयी आदरपूर्वक वागण्याची शिकवण मिळाली तर समाजामध्ये महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. त्यासाठी पालकांचीही जबाबदारी महत्त्वपूर्ण असून मुलांशी वार्तालाप वाढविणे अत्यंत आवश्यक आहे.’ असा सूर महिला सुरक्षा या विषयावरील चर्चासत्रात उमटला.
इनरव्हील क्लब ऑफ जळगाव व रोटरी राॅयल्स जळगाव यांच्या वतीने ‘महिला सुरक्षा’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमास इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन, सचिव निशिता रंगलानी, रोटरी रॉयल्सच्या अध्यक्षा वर्षा रंगलानी, सचिव स्नेहा ग्यानचंदानी, पिंकी मंधान तसेच दोन्ही क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आताची परिस्थिती बघता अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असून ‘महिलांची सुरक्षा’ ही एक सामाजिक समस्या उद्भवली आहे. या समस्येवर सर्वांच्या प्रयत्नाने तातडीने मात करण्याची आवश्यकता आहे. यासाठी चर्चासत्रात विचार मंथन करण्यात आले.
यात निता जैन यांनी अत्याचारांची घटना घडत असेल तर त्यावर तत्काळ गुन्हा नोंदवून कार्यवाही केली पाहिजे, तर महिलांनी संरक्षणाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे असे दिप्ती अग्रवाल म्हणाल्या. पालकांनी मुलांशी खुल्या मनाने संवाद साधला पाहिजे असे मनोगत सचिन पटेल यांनी व्यक्त केले. डॉ. बिंदू छाबडा यांनी मुलांना पालकांनी महिलांशी आदरपूर्वक वागायला शिकवले पाहिजे असे सांगितले.
स्वरक्षणासाठी महिलांनी आपल्याजवळ मिरचीपूड चा स्प्रे आपल्या जवळ बाळगला पाहिजे आणि गरज पडेल तेव्हा त्याचा वापर केला पाहिजे असे नैन लाहोरी यांनी सांगितले. महिला सुरक्षा विषयीचे कायदे यावर उदाहणांसहित गुरदीप सिंग अहलूवालिया यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन यांनी केले. प्रश्न-उत्तरांच्या स्वरुपात झालेल्या चर्चासत्रात इनरव्हील क्लबतर्फे निता जैन व दिप्ती अग्रवाल व रोटरी रॉयल तर्फे गुरदीप सिंग अहलूवालिया, सचिन पटेल, डॉ. बिंदू छाबडा व नैन लाहोरी यांनी विचार व्यक्त केलेत. रोटरी रॉयल्सच्या अध्यक्षा वर्षा रंगलानी यांनी प्रश्न विचारले.
