पाचोरा | दि. ९ (वास्तव पोस्ट न्यूज )– लोकसभा निवडणुकीचा प्रचार निर्णायक टप्प्यात आला असतांनाच आज सायंकाळी करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शहरातून भव्य मशाल रॅली काढण्यात आली.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील मविआच्या समर्थकांनी कंबर कसली आहे. गेल्या सुमारे पंधरा दिवसांपासून मतदारसंघातील कान्याकोपर्यातील गावांमध्ये प्रचार फेर्या काढून परिवर्तनाचा जागर करण्यात आला. यासोबत, सभा, कॉर्नर सभा, मेळावे, भेटीगाठी आदींच्या माध्यमातूनही प्रचारासह मोर्चेबांधणी करण्यात आली. आता प्रचाराचे दोन दिवस बाकी असतांनाच यात मोठ्या प्रमाणात रंगत भरलेली आहे. या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या वतीने पाचोरा शहरातून आज भव्य मशाल यात्रा काढण्यात आली.
पाचोर्यातील महाराणा प्रताप चौकातून मशाल रॅली निघाली. प्रारंभी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. डोक्यावर भगवे फेटे आणि हाती मशाल घेऊन महाविकास आघाडीचे शेकडो पदाधिकारी पाचोर्यातील प्रमुख मार्गावरून निघाले तेव्हा उपस्थितांनी याला भरभरून प्रतिसाद दिली. ढोल-ताशांचा गजर आणि जयघोषाने परिसर दुमदुमल्याचे दिसून आले. विविध भागांमधून मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात या यात्रेची सांगता करण्यात आली.
या मशाल यात्रेत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार, आम आदमी पक्ष आदींचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
