जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा निवडणूकीच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार असून दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान तर दि.२३ नोव्हेंबर रोजी निकाल घोषित होणार आहेत. जळगाव शहरात यावेळी चौरंगी लढत होत असुन पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने बंड करून अपक्ष म्हणून लढत असलेले उमेदवार देखील दावेदार ठरू पहात आहेत.

जळगाव शहर मतदार संघात माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे प्रचारात आघाडीवर असून ते डिजिटल, सोशल मिडिया आणि रिल्स पेक्षा थेट मतदारांमध्ये जाऊन आपल्या कार्याचा लेखाजोखा मांडत आहेत. सशस्त्र पोलीस संरक्षणात दिवसभर प्रचारात व्यस्त राहून देखील संध्याकाळच्या वेळेत विविध भागात त्यांनी सभा घेतल्या असून त्यांच्या भाषणास मिळणारी दाद तसेच सभेस आणि प्रत्येक कॉलनीत प्रचारास कार्यकर्त्यांकडून व जनतेकड़ून मिळणारी उत्स्फूर्त साथ बघता कुलभूषण पाटील यांनी आपली दावेदारी मजबूत केली आहे.

नगरसेवक ते उपमहापौर असा प्रवास आणि या दरम्यान त्यांनी केलेली कामे उल्लेखनीय आहेत. या अतिशय कमी वेळात जनमाणसात अगदी मतदानाचा अधिकार नसलेल्या बालकांत तसेच जेष्ठांमध्ये मिळालेली लोकप्रियता बघता दि.२३ रोजीच्या निकालात याची पावती मिळणार व कुलभूषण पाटील हेच निवडून येणार अशी आशा त्यांचे कार्यकर्ते तसेच नागरिक देखील बोलून दाखवत आहेत.

पिंप्राळा येथे प्रचाराचाच एक भाग म्हणून काल दि.१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. नेहमीप्रमाणे या सभेस देखील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी कुलभूषण पाटील यांनी निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केले. तसेच गेल्या १० वर्षात जळगाव शहराची ओळख ‘अविकसित शहर’ झाली असून ही ओळख मी पुसून ‘विकसित शहर’ अशी नवीन ओळख निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान शहरातील तरुण वर्गाला रोजगार, महिला वर्गाला सुरक्षा आणि ह्या शहराचा सर्वांगीण विकास करून जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर पोहचवणार अशी ग्वाही यावेळी कुलभूषण पाटील यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना दिली. सभेस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि एक मताने मोठ्या संख्येने कुलभूषण पाटील यांनाच मतदान करू अशी ग्वाही नागरिकांनी दिली.
