राजस्थान, दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राजस्थानमध्ये सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली असुन येथील सिरोही नगरपरिषदेचे अध्यक्ष आणि नगरपरिषदेच्या माजी आयुक्तांवर २० महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंगणवाडीत नोकरी देण्याचे आमिष दाखवत या आरोपींनी महिलांवर अत्याचार केल्याचा दावा केला जातोय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की , पाली जिल्ह्यात ही घटना घडली असून यातील एका कथित पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. दोन आरोपींनी साधारण २० महिलांना अंगणवाडीत नोकरी देण्याचे आमिष दाखवत त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप महिलांकडून करण्यात आला आहे.
जेवणात गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार
तक्रारदार महिलेसह अन्य महिला काही महिन्यांपूर्वी अंगणवाडीत काम करण्यासाठी सिरोही येथे गेल्या होत्या. त्याठिकाणी त्यांची आरोपींसोबत ओळख झाली. या आरोपींनी महिलेच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. महिलेच्या तक्रारी नुसार मला देण्यात आलेल्या जेवणात गुंगीचे औषध टाकण्यात येत होते. शुद्ध हरपल्यानंतर माझ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला, असे या महिलेले आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
त्या दोघांनी व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा आरोप
आरोपींनी अत्याचार करताना व्हिडीओ रेकॉर्डिंग करून हे व्हिडीओ रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. इतकेच नाही तर माझ्यासह अन्य २० महिलांसोबत असा प्रकार घडल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आहे.
त्या महिलेकडून खोटी तक्रार ?
दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिकारी पारस चौधरी यांनी अधिक माहिती दिली. चौधरी यांच्या म्हणण्यानुसार कथित पीडित महिलेने पोलिसांत खोटी तक्रार दाखल केली होती. मात्र आठ महिलांनी याचिका दाखल केल्यानंतर राजस्थान उच्च न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश दिला.
