Headlines
Home » महाराष्ट्र » खबरदार : बेकायदा वृक्षतोड केल्यास भरावा लागणार ५० हजारांचा दंड !

खबरदार : बेकायदा वृक्षतोड केल्यास भरावा लागणार ५० हजारांचा दंड !

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पर्यावरण संवर्धन काळाची गरज असुन, सर्रास होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरण समतोल बिघडत चालला आहे. बेकायदा होत असलेल्या वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी बेकायदा वृक्षतोडीच्या दंडाची रक्कम एक हजार रुपयांवरून ५० हजार करण्यात येणार आहे. यासाठी पुढील आठवड्यात आदेश जारी करण्यात येणार असल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

आमदार राहुल पाटील यांनी जिंतूरजवळील महामार्गासाठी ४०० वर्षे जुनी वडाची मोठी झाडे तोडल्याचा एक तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी चर्चेला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, अवैधरित्या वृक्षतोडीसंदर्भात १९६७ च्या कायद्यानुसार एक हजार रुपयांचा दंड आकारला जातो. त्यात नंतरच्या काळात वाढ केलेली नाही. १९६७ च्या हजार रुपयांचे आजचे मूल्य हे पन्नास पटीने वाढले असल्यामुळे यापुढे अवैधरित्या होणाऱ्या वृक्षतोडीला पन्नास हजार रुपये दंड आकारला जाईल. यासंदर्भात सोमवारपर्यंत लेखी आदेश सोमवारपर्यंत जारी केला जाईल.

दरम्यान खासगी जमिनीतील वृक्षतोडीसंदर्भात एखाद्या व्यक्तीने विहित नमुन्यात परवानगी मागितल्यास त्यासंदर्भात दिलेल्या ठराविक कालावधीत निर्णय देणे संबंधित अधिकाऱ्यास बंधनकारक केले जाईल. तसेच वेळेत निर्णय न घेणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड ठोठावण्यात येईल. याबाबतचेही आदेश जारी करणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!