नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : भारतीय संसदेच्या लोकसभेत आज एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. बहुचर्चित वक्फ संशोधन विधेयक २०२५ अखेर मंजूर झाले आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चा आणि मतदान प्रक्रियेनंतर हे विधेयक लोकसभेत बहुमताने पारित झाले. सदर विधेयकाच्या बाजूने २८८ मते, तर विरोधात २३२ मते पडली. आता हे विधेयक आज, ३ एप्रिल २०२५ रोजी राज्यसभेत सादर केले जाणार असून, तिथेही त्याला मंजुरी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले. विधेयकावर चर्चा सुरू होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु झाली. सुमारे आठ तासांहून अधिक काळ चाललेल्या या चर्चेदरम्यान विरोधकांनी या विधेयकाला असंवैधानिक असल्याचे सांगत आक्षेप नोंदवले. तर सत्ताधारी पक्षाने हे विधेयक वक्फ संपत्तीच्या पारदर्शी व्यवस्थापनासाठी आवश्यक असल्याचा दावा केला.
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मतदानाचा निकाल जाहीर करत, विधेयकाच्या बाजूने २८८ मते आणि विरोधात २३२ मते पडली असल्याचे जाहीर केले. भारतीय जनता पक्षाला (भाजप) विधेयक मंजूर करण्यासाठी २७२ मतांची आवश्यकता होती. भाजपकडे स्वतःचे २४० खासदार असून, मित्रपक्षांच्या पाठिंब्याने त्यांनी हे विधेयक यशस्वीपणे पारित केले.
विधेयक आज राज्यसभेत सादर होणार
लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर आता हे विधेयक राज्यसभेत सादर होणार आहे. राज्यसभेत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे मित्रपक्षांचा पाठिंबा आणि काही तटस्थ पक्षांची मते मिळवणे भाजपसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. विरोधकांनी राज्यसभेतही या विधेयकाला कडाडून विरोध करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे राज्यसभेतही गोंधळ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
