नवी दिल्ली | दि१० ( वास्तव पोस्ट न्यूज )– नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या पतंजलीच्या जाहिराती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि सरकारला फटकारले आहे. बाबा रामदेव यांचा माफीनामा देखील स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच सरकारच्या उत्तरावर न्यायालयही समाधानी नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाशी सबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनाही न्यायालयाने फटकारले असुन पुढील कारवाईसाठी तुम्ही तयार राहा, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला.
दरम्यान बाबा रामदेव यांनी बिनशर्त माफीही मागितली होती. बाबा रामदेव यांचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात वाचण्यात आले. न्यायमूर्ती अमानुल्ला म्हणाले, ‘आम्ही आंधळे नाही.’ तुमचा माफीनामा हा केवळ दिखावा आहे. ते समर्थनीय नाही, असे सांगण्यात आले. आम्ही मान्य करणार नाही, हा तुमचा अतिशय निष्काळजीपणा आहे.
केंद्राने हे प्रकरण २०२० मध्ये उत्तराखंड सरकारकडे पाठवले होते. मात्र त्यांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. ज्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात निष्क्रियता दाखविली त्यांच्यावर तुम्ही गुन्हा का दाखल केला नाही, असा सवाल न्यायालयाने अधिकाऱ्यांना केला. त्यांच्याशी तुमची मिलीभगत आहे असे आम्ही का समजू नये ? या अधिकाऱ्यांना आता निलंबित करा, असे न्यायालयाने म्हटले आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवरही ताशेरे ओढले. कोविडच्या काळात पतंजलीने आधुनिक औषध नाकारले असताना केंद्र सरकारने कारवाई का केली नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली होती.
