Home » महाराष्ट्र » मालवण येथे शिवकालीन किल्ल्यांच्या अभ्यासासाठी अध्यासन केंद्र : मंत्री आशिष शेलार

मालवण येथे शिवकालीन किल्ल्यांच्या अभ्यासासाठी अध्यासन केंद्र : मंत्री आशिष शेलार

वास्तव पोस्ट l मुंबई : सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठअंतर्गत स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारण्यात येणार असून त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून निधीला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिली. या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील किल्ल्यांच्या अभ्यास, संशोधन आणि दस्तावेजीकरणाला नवी दिशा मिळणार असून हे अध्यासन मालवण येथे स्थापन होणार आहे.

सदर अध्यासन केंद्र ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन, संशोधन प्रबंध, व्याख्यानमाला, युवा संशोधकांना मार्गदर्शन आणि सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट, सर्जेकोट या चारही किल्ल्यांच्या वारशाचे शास्त्रशुद्ध नोंदणीकरण अशा प्रकारचे बहुआयामी उपक्रमांसाठी कार्य करणार आहे. शिवकालीन व्यापाराचे महत्वाचे केंद्र म्हणून ओळखल्या गेलेल्या या भागातील ऐतिहासिक दाखल्यांचा सखोल अभ्यास होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा व्यापक प्रसार करण्यास हे अध्यासन हातभार लावेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. शेलार यांनी व्यक्त केला आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याला ३५८ वर्षे १२ एप्रिल २०२५ ला पूर्ण झाली, त्या निमित्ताने आयोजित केलेल्या गडावरील सांस्कृतिक कार्यक्रमात मंत्री ॲड. शेलार यांनी या अध्यासनाची घोषणा केली होती. पालकमंत्री नितेश राणे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी मालवण मधील या विषयाच्या तज्ज्ञांना घेऊन प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्याचा अभ्यास करून शासनाने या अध्यासनाची रचना केली आहे. दरम्यान या चार किल्ल्यांबद्दल अभ्यासपूर्ण माहिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे, या विषयासंदर्भात सर्व कागदपत्रे जमा करून त्यावर अभ्यास करावा लागणार आहे. याठिकाणी व्यापाराचे बेट होते, त्याबाबतचे ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध आहेत.

याद्वारे जास्तीत जास्त युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी, देश घडवावा, राज्य घडवावे आणि त्याचा अभ्यास करावा. असे मंत्री अ‍ॅड. शेलार यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!