PARBHANI VIOLENCE : सोमनाथ सूर्यवंशी दलित आहे. ते संविधानाचे संरक्षण करत होते. त्यामुळे त्यांना मारण्यात आले. म्हणून या घटनेला मी त्यांचा खून असे म्हणेल. मुख्यमंत्री तसेच विचारधारा या घटनेस जबाबदार असल्याचे सांगत राज्य सरकारवर राहुल गांधी यांनी टिका केली.
परभणी ( वास्तव पोस्ट ) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज दि.२३ सोमवार रोजी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी दाखल झाले. यावेळी सूर्यवंशी कुटुंबीय भावून झाले. जमिनीवर बसून राहुल गांधी यांनी त्यांच्याशी सुमारे २० ते २५ मिनिटे चर्चा केली. यावेळी सूर्यवंशी कुटुंबाकडून संपूर्ण घटनाक्रम त्यांनी जाणून घेतला, व सांत्वन केले.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला नाही तर त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या पोलिसांनीच केली आहे. सोमनाथ सूर्यवंशी हे दलित असल्यामुळे त्यांना मारण्यात आले. ते संविधानचे संरक्षण करत होते, त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.
■ सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीत मृत्यू :
पिडित कुटुंबाच्या भेटीनंतर राहुल गांधी म्हणाले, सोमनाथ सूर्यवंशी यांचा शवविच्छेदन अहवाल मी पाहिला आहे. त्यांचे व्हिडिओ पहिले आहे. फोटोग्रॉफ पाहिले आहे. ते पहिल्यावर ९९ टक्के नाही तर शंभर टक्के सांगतो, त्यांचा मृत्यू पोलीस कठोडीत झाला आहे. त्यांना श्वसनाचा कोणताही आजार नव्हता. त्यांच्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जे वक्तव्य केले ते खोटे बोलले आहे.
■ घटनेस मुख्यमंत्री जबाबदार !
माध्यमांनी राहुल गांधी यांना विचारले की या घटनेवर राजकारण होत नाही का? त्यावर मात्र राहुल गांधी संतप्त झाले. काहीही राजकारण नाही. या घटनेत ज्या लोकांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना मारले आहे, त्यांना शिक्षा मिळावी. या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री तसेच विचारधारा ही या घटनेस जबाबदार आहे. पोलिसांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री खोटे बोलले आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
दरम्यान आंबेडकर चळवळीचे जेष्ठ नेते विजय वाकोडे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. त्यांच्याही घरी राहुल गांधी यांनी भेट देत कुटुंबाची विचारपुस केली. सोमनाथ सूर्यवंशी यांचा अंत्यविधी झाल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत होते. विजय वाकोडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथेच त्यांचा मृत्यू झाला. यावेळी विजय वाकोडे यांच्या कार्याचा आढावा राहूल गांधी यांनी घेतला.