पुणे ( वास्तव पोस्ट ) : आळंदी येथील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. या धक्कादायक या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्याचाराचा आरोप संस्थाचालकाच्या मेव्हण्यावर करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस डीसीपी शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारा वर्षांच्या दोन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती आहे. पीडित मुलांनी ही माहिती त्यांच्या पालकांसह संस्थाचालकाच्या पत्नीला दिली होती. मात्र, संस्थाचालकाच्या पत्नीने तात्काळ पोलिसांना माहिती न देता या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तिला देखील सहआरोपी बनवण्यात आले आहे.
याच संस्थेतील एक शिक्षक देखील सदर प्रकरणात आरोपी असल्याचे कळते. पोलिसांनी आरोपींविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेनंतर वारकरी समुदायात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. संस्थेत शिकणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पालकांनी आणि वारकरी संघटनांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.