वास्तव पोस्ट | मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये आणि टाटा ट्रस्ट्स तसेच महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये १२ सामंजस्य करार (MoU) करण्यात आले. यामध्ये ग्रामविकास, जलसंधारण, सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास, गडचिरोली जिल्हा प्रशासन, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, नागपूर येथील राष्ट्रीय कर्करोग संस्था, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (CIIMS), केअर हॉस्पिटल, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन, मिडास मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सोबत सामंजस्य करारांचा समावेश आहे.
यासोबतच, मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन, टाटा मोटर्स फाऊंडेशन आणि नाम फाऊंडेशन यांच्यात स्वतंत्र करार करण्यात आला आहे. या करारामुळे ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजने’अंतर्गत आगामी पावसाळ्यापूर्वी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील १५०० जलस्रोतांचे पुनरुज्जीवन होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाद्वारे भूजल पुनर्भरण आणि दीर्घकालीन जलसुरक्षा सुनिश्चित केली जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र राज्य देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावत असतानाच राज्य शासन विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे परिवर्तन घडवून आणत आहे. आज टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशनसोबत झालेल्या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचणार आहे. या भागीदारींमुळे विविध कल्याणकारी योजना अधिक प्रभावी व लोकोपयोगी ठरतील. तसेच, या करारांमुळे समाजातील सर्व घटकांचे उत्पन्न वाढून जीवनमान उंचावण्यास मदत होईल. तसेच, या सामंजस्य करारांच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्यातील दुर्लक्षित घटकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी धोरणात्मक, बहुउद्देशीय आणि 3 वर्षांची भागीदारी सुरू करण्यात आली आहे.
नाम फाउंडेशन राज्यात जलसंधारण क्षेत्रात महत्त्वाचे काम करत असून जलस्त्रोतातील गाळ काढणे, नाले व नद्यांचे खोलीकरण-रुंदीकरण आदी कामे करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार योजना लोकचळवळीच्या स्वरूपात यशस्वी झाली असून नाम फाउंडेशनच्या सहभागामुळे विदर्भ व मराठवाड्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या भागांत जलसंधारणाची मोठी कामे झाली. यासाठी टाटा ट्रस्ट्सचीही मदत झाली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माता, नवजात बालक, बालक व किशोरवयीन मुलांसाठी आरोग्य सेवा बळकट करणे, टेलिमेडिसिनसह उपचार सुविधा वाढविणे, शहरी व दुर्गम भागांत सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करणे, एकात्मिक आपत्कालीन व्यवस्थापन सेवा सक्षम करणे, लहान मुलांची वाढ खुंटू नये व कुपोषण रोखणे, किशोरवयीन कुपोषण आणि रक्तक्षय दूर करणे, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष देणे, तलावांचे पुनरुज्जीवन व जलसंधारण, भूजल पुनर्भरण, मराठवाडा व विदर्भातील पाणीटंचाईग्रस्त भागात मृद व जलसंधारणाची अंमलबजावणी करणे, हवामान बदलाचा अभ्यास करून शेतीला चालना देणे, वन-आधारित आणि ग्रामीण बिगरशेती उपजीविकेला पाठबळ देणे, एकात्मिक ग्रामविकास साधणे यांचा यात समावेश आहे.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे, मंत्री आदिती तटकरे, मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा, ट्रस्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ शर्मा, टाटा मोटर्स चे सीएसआर हेड विनोद कुलकर्णी, नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

