वास्तव पोस्ट l नागपूर : जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. काटोल तालुक्यातील राऊळगाव शिवारात असलेल्या SBL एनर्जी लिमिटेड या व्यावसायिक स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत आज सकाळी भीषण स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत १७ कामगारांचा मृत्यू झाला असून, १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नेमकी घटना काय ?
आज १ मार्च रोजी सकाळी कामाची लगबग सुरू असताना अचानक कंपनीचा परिसर मोठ्या स्फोटाने हादरला. सकाळी ७:०० ते ७:१५ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील ‘एसबीएल एनर्जी लिमिटेड’ (SBL Energy Limited) या कंपनीच्या डिटोनेटर पॅकिंग युनिटमध्ये हा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला. SBL एनर्जी लिमिटेड ही कंपनी खाणकामासाठी लागणारी व्यावसायिक स्फोटके आणि डिटोनेटर्स बनवते. त्यामुळे स्फोटाची तीव्रता अधिक होती.


तपास, मदत आणि बचावकार्य
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) च्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ढिगारा उपसण्याचे आणि बचावकार्य करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी PESO (Petroleum and Explosives Safety Organisation) आणि DISH (Directorate of Industrial Safety and Health) चे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
प्रशासकीय कारवाई
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांप्रती शोक व्यक्त करत जखमींवर तातडीने आणि सर्वोत्तम उपचार करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या घटनेवर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जिल्हाधिकारी विपीन इटनकर आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे स्वतः घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षी (२०२५) देखील याच कंपनीत एक लहान स्फोट झाला होता, ज्यामध्ये दोन महिला कामगार जखमी झाल्या होत्या. आजच्या घटनेने कंपनीतील सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बचावकार्य अजूनही सुरू असून मृतांमध्ये काही महिला कामगारांचाही समावेश असल्याचे कळते.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण नागपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
