वास्तव पोस्ट l मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज दि.४ मार्च बुधवार रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे करत राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीचा पाठपुरावा करताना त्यांनी आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षिततेवरही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
एकनाथ शिंदेंच्या विमानाला ‘शूट डाऊन’ची धमकी?
रोहित पवार यांनी दावा केला की, जानेवारी २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस (स्वित्झर्लंड) दौऱ्यावर जात असताना त्यांच्या विमानाबाबत VSR विमान कंपनीने मोठी हलगर्जी केली होती. दावोस ला जाताना बहरीन येथे इंधन भरल्यानंतर स्वित्झरलँडच्या झ्यूरिककडे निघाले. मात्र थोड्याच वेळात इराणचे लढावू विमान आले आणि शिंदे यांच्या वैमानिकास सांगितले की ताबडतोब परत जा नाहीतर आम्ही विमान पाडू असा इशारा दिला. विमान तात्काळ इराककडे वळविण्यात आले परंतु त्यांच्याकडूनही तसाच इशारा मिळाला. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमान पुन्हा बहरीन ला आणण्यात आले.

विमानाकडे आवश्यक ‘ओव्हरफ्लाईट’ परवानग्या नसल्यामुळे इराण आणि इराकच्या हवाई दलाने त्यांचे विमान पाडण्याचा (Shoot down) इशारा दिला होता. या संकटामुळे विमान तातडीने बहरीनला उतरवल्यावर तीन तासांनंतर परवानग्या मिळाल्यावरच पुढील प्रवास सुरू झाला. “अजितदादांच्या बाबतीत जे घडलं, तसंच काहीसं शिंदेंच्या बाबतीतही घडणार होतं का?” असा जळजळीत सवाल त्यांनी विचारला. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत इतर अधिकारीही होते
विमान अपघात चौकशी अहवालवर संशय
२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या ज्या अपघातात अजित पवार यांचे निधन झाले, त्याबाबतच्या DGCA आणि AAIB च्या प्राथमिक अहवालावर रोहित पवारांनी जोरदार टीका केली. अहवालात विमान झाडांना धडकल्याचे म्हटले आहे, पण रोहित पवारांच्या दाव्यानुसार अपघातस्थळी झाडेच नव्हती. “मग हा रिपोर्ट कोणाला वाचवण्यासाठी बदलला जातोय?” असा त्यांचा सवाल आहे. तसेच विमानाच्या तांत्रिक नोंदींमध्ये (Logging hours) फेरफार करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
VSR कंपनीवर ‘रेकी’चा आरोप
रोहित पवार यांनी आरोप केला की, अपघाताच्या काही दिवस आधी बारामती विमानतळावर काही अज्ञात व्यक्तींनी ‘रेकी’ केली होती. तसेच, या विमान कंपनीचे मालक आणि सरकारमधील काही लोकांचे जवळचे संबंध असल्याचा दावा करत त्यांनी कंपनीच्या मालकाचे व्हॉट्सॲप चॅट्स तपासण्याची मागणी केली आहे.
"राजकारण बाजूला ठेवा, पण महाराष्ट्राच्या नेत्यांचे जीव अशा प्रकारे धोक्यात घालणाऱ्या यंत्रणांना आम्ही सोडणार नाही. हा केवळ अपघात नसून एक मोठे षडयंत्र असण्याची शक्यता आहे."
रोहित पवार
रोहित पवारांच्या या दाव्यांमुळे आता सरकार आणि तपास यंत्रणांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. विशेषतः एकनाथ शिंदे यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

