मुंबई ( वास्तव पोस्ट ) : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केरळ राज्याचा “मिनी पाकिस्तान” असा उल्लेख केल्याबद्दल सत्ताधारी आघाडी आणि विरोधकांची टीका केली आहे. केरळ हे मिनी पाकिस्तान आहे म्हणून राहुल गांधींची बहीण तिथे निवडून आली, सगळे अतिरेकी त्यांना मतदान करतात. अतिरेकी लोकांना धरूनच हे लोक खासदार झालेले आहेत” असा धक्कादायक आरोप नितेश राणे यांनी केला. इतकंच नाही तर “राहुल गांधींना आणि प्रियंका गांधींना अतिरेकी मतदान करतात. अतिरेकींना धरून ते खासदार झालेत” असंही नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, हिंदुत्वाच्या विषयावर आक्रमकपणे बोलताना नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी निषेध व्यक्त करताना असे म्हटले की, ‘केरळचा मिनी पाकिस्तान म्हणून उल्लेख करणे निषेधार्ह आहे. केरळ धर्मनिरपेक्षता, सांप्रदायिक मित्रत्वाचा बालेकिल्ला आहे. त्या केरळच्या विरोधात संघ परिवाराने आखलेल्या द्वेषपूर्ण मोहिमांचे असे वक्तृत्व प्रतिबिंबित करते.
केरळवरील या घृणास्पद हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो’, असे म्हणत नितेश राणे यांच्या वक्तव्यावर पिनाराई विजयन यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.