मलेशिया ( वास्तव पोस्ट ) : येथे सुरु असलेल्या महिला अंडर-19 क्रिकेट विश्वचषकात अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. आफ्रिकेची कर्णधार कायला रेनेकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर अक्षरशः नांगी टाकली. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ केवळ ८२ धावांत गारद झाला. दक्षिण आफ्रिकेच्या चार फलंदाजांना धावांचे आपले खाते देखील उघडता आले नाही. भारताची लेग स्पिनर गोंगाडी त्रिशाने ४ षटकांमध्ये फक्त १५ धावा देत सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. पारुणिका सिसोदिया, आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्माने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेकडून मिके व्हॅन वुर्स्ट हीने सर्वाधिक २३ धावा केल्या. मात्र, गोंगाडी त्रिशाच्या गोलंदाजीवर ती यष्टिचित झाली. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार कायला रेनेके २१ बॉल्समध्ये फक्त ७ धावा करू शकली. दक्षिण आफ्रिकेने ठेवलेल्या ८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ११.२ षटकांमध्ये एक विकेट गमावली. त्रिशाने ३३ चेंडूत ८ चौकार खेचत ४४ धावा केल्या. सानिका चाळकेने २२ चेंडूंत २६ धावा करून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिकेला बजावली.
भारतीय महिला संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली
महिलांच्या अंडर-19 T20 विश्वचषकात पहिल्यांदाच एका संघाने संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता विजेतेपदही पटकावले आहे. भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला. भारतीय महिला संघापूर्वी 19 वर्षाखालील T20 विश्वचषक स्पर्धेत कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आली नव्हती. निक्की प्रसादच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने प्रत्येक सामन्यात प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. भारताने महिला अंडर 19 टी-20 विश्वचषकाच्या गेल्या हंगमाचे विजेतेपदही पटकावले होते.

युवा खेळाडूंसाठी प्रेरणा
भारतीय संघाने स्पर्धेत त्यांच्या दमदार सुरुवातीपासून ते अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली. सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा हा प्रवास भारतीय क्रिकेटसाठी एक महत्त्वाची कामगिरी आहे. हा विजय केवळ संघाच्या कठोर परिश्रमाचे फळ नाही तर भारतीय महिला क्रिकेटच्या भविष्यासाठी एक सुवर्णसंधी देखील आहे. भारताच्या १९ वर्षांखालील महिला संघाचे हे यश तरुण क्रिकेटपटूंसाठी प्रेरणास्रोत ठरेल. गेल्या वेळी भारतीय महिला संघाने शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता.
