Home » महाराष्ट्र » पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ ; आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी केली अटक

पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ ; आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी केली अटक

IPS POOJA KHEDKAR : पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवण्यात आले आहे. तसेच पूजा खेडकर यांच्या आईने मुळशीमधील शेतकऱ्यांना धमकवल्याप्रकरणी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणात पुणे पौड पोलीसांनी त्यांना अटक केली आहे.

पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी अखेर अटक केली आहे. पुणे पोलिसांची चार पथकं मनोरमा खेडकर यांच्या शोधात होते. त्या रायगड जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये लपल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर महाडमधील हिरकणवाडी येथे सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. हिरकणवाडीच्या हॉटेल पार्वतीमधून त्यांना अटक केली गेली. त्यांना पुण्यात न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना धमकवल्याच्या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होता. त्यानंतर त्या फरार झाल्या होत्या.

दरम्यान पुजा खेडकर यांच्याही अडचणी वाढल्या असून पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवून त्यांना मसूरी येथील लाल बहादुर शास्त्री नॅशनल ॲकेडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तातडीने परत बोलवले आहे.

मनोरमा खेडकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर गुन्हा दाखल :
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांचे संपूर्ण कुटुंबच वादात आले आहे. पूजा खेडकर यांचे कारनामे उघड झाल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांचे कारनामे समोर आले आहेत. पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांनी मुळशीमधील शेतकऱ्यांना धमकवल्या प्रकरणी एक व्हिडिओ माध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर मनोरमा खेडकर यांच्यावर पुण्यातील पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मात्र मनोरमा खेडकर ह्या फरार झाल्या होत्या.

पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यातल्या धडवली गावात खेडकर कुटुंबाने २५ एकर वादग्रस्त जमीन खरेदी केली होती. या जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्यामुळे शेजारील शेतकऱ्यांनी खरेदी प्रकरणी विरोध केला होता. या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यासह त्यांचे पती दिलीप खेडकर, अंबादास खेडकर, दोन पुरुष बाउंसर, दोन महिला बाउन्सर आणि इतरांवर शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर यांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!