नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन गुगलने आज भारतामध्ये AI (आर्टिफिशियल इंटेलीजेंस) असिस्टंट जेमिनी मोबाइल अॅप लाँच केले आहे .मराठी, हिंदी, उर्दू, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलुगू, अशा एकूण नऊ भाषांमध्ये जेमिनी अॅप आता उपलब्ध आहे. युजर्संना टाइप करण्यासाठी, बोलण्यासाठी किंवा आवश्यकतेनुसार फोटो जोडण्यासाठी हे ॲप परवानगी देते.
दरम्यान या बाबत गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हटले की, “आम्ही जेमिनी अॅडव्हान्स्डमध्ये या स्थानिक भाषांसह अन्य सोयी सुविधा देखील उपलब्ध करून देत आहोत. तसेच गुगल मेसेज मध्ये जेमिनी AI असिस्टंट इंग्रजी भाषेमध्ये लाँच करत आहोत”.
याव्यतिरिक्त जेमिनी अॅडव्हान्स्डमध्ये डेटा विश्लेषण क्षमता, फाइल अपलोड करणे आणि गुगल मेसेजमध्ये जेमिनीसह चॅट करण्यासाठीचे फीचरही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे फीचर इंग्रजी भाषेमध्ये असेल. पुढील काही आठवड्यांमध्ये iOS वर गुगल ॲपमध्ये थेट जेमिनी एआय असिस्टंटचा वापर करणे शक्य असल्याचे जेमिनी एक्सपीरियंस इंजीनियरिंग चे उपाध्यक्ष अमर सुब्रमण्यम यांनी आपल्या ब्लॉग वर म्हटले आहे.
गुगल AI असिस्टंट जेमिनीला भारतातील पहिल्या वर्षामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला असुन, विद्यार्थ्यांपासून ते डेव्हलपर्संपर्यंत आणि अन्य लोकांनीही दैनंदिन जीवन अधिक सुखकर तसेच क्रीएटिव्हिटी वाढवण्यासाठी जेमिनीचा वापर करत आहेत असेही सुब्रमण्यम पुढे म्हणाले.
