नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन झालं आहे. मनमोहन सिंह यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचेनिधन झाले त्यांच्या निधनामुळे काँग्रेससह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. त्यांना श्वसनास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी एम्स रुग्णालयात दिग्गज डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले. यावेळी मनमोहन सिंह यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली.
काँग्रेस पक्षाने उद्याचा आपला संपूर्ण कार्यक्रम रद्द केला असून पक्षाध्यक्ष खरगे यांच्यासह अनेक नेते दिल्लीत पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना दिल्ली येथील एम्सच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. डॉ.मनमोहन सिंह २००४ ते २०१४ पर्यंत भारताचे पंतप्रधान होते. याआधी ते भारताचे अर्थमंत्री आणि वित्त सचिवही होते.
राहुल गांधी बेळगावीहून दिल्लीला रवाना
मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी समजताच राहुल गांधी यांनी उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. बेळगावहून ते दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान, प्रियांका गांधी एम्समध्ये पोहोचल्या आहेत. याशिवाय इतर अनेक काँग्रेस नेत्यांची एम्समध्ये पोहोचत आहेत.
डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी अविभाजित भारतातील पंजाब प्रांतात झाला. ते भारतातील सर्वात शिक्षित पंतप्रधानांपैकी एक होते. देशातील महान अर्थ तज्ज्ञांमध्ये त्यांची गणना होते. डॉ.मनमोहन सिंह पंजाब विद्यापीठातून परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यांनी ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतले. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी.फिल पदवीही मिळवली. भारत सरकारमध्येही त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स वर दुःख व्यक्त केले आहे.
आर्थिक सुधारणांमध्ये मोठे योगदान
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये मोठे योगदान दिले आहे. मनमोहन सिंग १९९१ ते १९९६ पर्यंत भारताचे अर्थमंत्री होते. या काळात त्यांनी अनेक आर्थिक सुधारणा केल्या. त्यांच्या आर्थिक सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाली. १९९१ मध्ये डॉ.मनमोहन सिंग पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य झाले. २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर डॉ. मनमोहन सिंह भारताचे पंतप्रधान झाले. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. यानंतर २००९ मध्ये ते दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले.