नाशिक विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा शानदार शुभारंभ…
धुळे ( वास्तव पोस्ट ) : “प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तणावमुक्त जीवनासाठी दिवसातून किमान एक तास खेळासाठी द्यावा, यामुळे कार्यक्षमता वाढेल आणि प्रशासन अधिक गतीमान होईल,” असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. नाशिक विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२५ चा भव्य उद्घाटन सोहळा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते आज शुक्रवार दि ७ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, धुळे येथे संपन्न झाला.

यावेळी आमदार मंजुळा गावित, राघवेंद्र पाटील, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडा, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर (धुळे), जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (जळगाव), मित्ताली सेठी (नंदूरबार), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अर्जुन पुरस्कार विजेती ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, धनंजय गोगटे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

नाशिक विभागीय महसुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद दहा वर्षांनंतर धुळे जिल्ह्याला मिळाले असून, हा गौरवाचा क्षण आहे. धुळे मॅरेथॉन सारख्या स्पर्धांनंतर हा उपक्रम अधिक प्रेरणादायी ठरणार आहे. तसेच निरोगी जीवनासाठी दररोज एक तास खेळासाठी देणे महत्त्वाचे आहे. २०३६ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री रावल यांनी केले. स्पर्धा तणावमुक्त जीवनासाठी उपयुक्त असून, यामुळे प्रशासन अधिक गतिशील होईल, असेही ते यावेळी म्हणाले.
विभागीय आयुक्त डॉ.गेडाम म्हणाले की, “अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा तणाव मोठ्या प्रमाणात असतो. अशा स्पर्धांमुळे तो दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे खेळाचा आनंद घ्या आणि खिलाडूवृत्ती जोपासणे आवश्यक आहे.”
दरम्यान ध्वजारोहण करून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी क्रीडा ज्योत प्रज्वलन करण्यात आली. स्पर्धेच्या स्मरणिकेचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले. सहभागी खेळाडूंना कविता राऊत यांनी शपथ दिली. रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून स्पर्धेचा शुभारंभ झाला.
■ १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेतील विजेते :
पुरुष गट : महेश निकम (अहिल्यानगर), बालकृष्ण कुमार (नाशिक), अनिल पठाडे (जळगाव)
महिला गट : पूनम चौरे (धुळे), वैशाली सहारे (नाशिक), रुपाली बडे (अहिल्यानगर)
विजेत्यांना पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, पुनम बेडसे यांनी केले. आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले. ६५० पेक्षा अधिक खेळाडू तसेच महसूल अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
