वास्तव पोस्ट l मुंबई : राज्य शासन स्वच्छ हवा, स्वच्छ ऊर्जा आणि स्वच्छ वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. मुंबई क्लायमेट विकदरम्यान आयोजित अर्थशॉट प्राईज उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. याप्रसंगी अर्थशॉट प्राईजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेसन नॉफ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मंत्री मुंडे म्हणाल्या की विकासासोबत जबाबदारीही येते, हे लक्षात घेणे आवश्यक असुन औद्योगिक आणि तांत्रिक प्रगतीमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा गांभीर्याने विचार करून पुढील वाटचाल करावी लागेल. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर सुरू होणाऱ्या कृतींचा जागतिक पातळीवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पर्यावरण संवर्धन हे आर्थिक विकासाला चालना देणारे आहे, हे भारताने जगाला दाखवून दिले आहे. कचरा व्यवस्थापनासाठी वैज्ञानिक पद्धती, चक्रीय अर्थव्यवस्था आणि कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती यांवर भर दिला जात असून स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी सक्रिय आहेत. यामुळे ऊर्जा स्वावलंबन साध्य होण्यास मदत होईल, असे मंत्री मुंडे यांनी सांगितले.
जगप्रसिद्ध ‘द अर्थशॉट प्राईज’ या जागतिक पर्यावरणीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नोव्हेंबर २०२६ मध्ये मुंबईत होणार असल्याची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली. भारतात प्रथमच अर्थ शॉट प्राईज उपक्रम होत असल्याचा आनंद व्यक्त करत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या आयोजनासाठी सर्व सहभागी व आयोजकांचे आभार मानले. यावेळी या स्पर्धेतील अंतिम स्पर्धकाची मुलाखतही घेण्यात आली.

