Home » महाराष्ट्र » बांगलादेशातील भारतीयांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची परराष्ट्रमंत्री सोबत चर्चा

बांगलादेशातील भारतीयांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची परराष्ट्रमंत्री सोबत चर्चा

CM meet Minister Jaishankar : बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसह अभियंते आणि इतरांची त्यांच्या लोकेशनसह माहिती परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली आहे. त्यांना तातडीने मायदेशात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत.

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : बांगला देशातील सध्याच्या उद्भवलेल्या परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. बांगलादेशातील बाधित देशवासीयांना परत आणण्याच्या कार्यवाहीसाठी परराष्ट्र मंत्रालयात सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्र्यांनी यावेळी दिली.

बांगलादेशातील भारतीय दूतावासामार्फतही आवश्यक त्या सर्व उपयोजना करण्यात येत आहेत. तिथे अडकलेल्या देशातील कोणत्याही विद्यार्थ्यांस, अभियंते किंवा इतर भारतीयास हानी पोहोचणार नाही आणि त्यांना सुरक्षितरित्या मायदेशात परत आणण्यात येईल. तिथे अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी, अभियंते यांनाही तातडीने सुरक्षितपणे परत आणण्यात येईल, असे एस. जयशंकर यांनी यावेळी सांगितले.

बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते यांची सर्व प्रकारची माहिती संकलित करण्यात आली असून त्यांच्याशी संपर्क साधणे, मदत उपलब्ध करून देणे यासंदर्भातील कार्यवाहीसाठी राज्यात एक पथकही नियुक्त करण्यात आले आहे. राज्यातील या बाधितांना जलद गतीने मायदेशात परत आणण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी या चर्चेदरम्यान सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!