Home » महाराष्ट्र » शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

वास्तव पोस्ट l पुणे : अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा आज शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषातून संकटांशी लढण्याची प्रेरणा मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. हिंदवी स्वराज्य स्थापन करताना महाराजांनी प्रजेला केंद्रस्थानी ठेवून कल्याणकारी राज्य उभारले. स्वराज्याबद्दलची तळमळ, निष्ठा आणि पराक्रम यांच्या जोरावर त्यांनी काळाच्या पुढे विचार करणारे शासन दिले.

यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पर्यटन सर्किट उभारणे, स्वच्छता-संवर्धन मोहिम राबवून ऐतिहासिक वारसा जपणे यावर सरकार भर देत आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गड-किल्ल्यांच्या स्वच्छता व संवर्धन मोहिमही हाती घेतली जाणार आहे. मराठा लष्करी लँडस्केप म्हणून ११ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला असून ही बाब अभिमानास्पद असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना अधोरेखित केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!