Headlines
Home » आंतरराष्ट्रीय » मोठी बातमी: इस्राईलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेई यांचे निधन !

मोठी बातमी: इस्राईलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेई यांचे निधन !

वास्तव पोस्ट l वृत्तसंस्था : इराणमधून अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेई यांचे शनिवारी २८ फेब्रुवारी रात्री उशिरा झालेल्या इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हवाई हल्ल्यात निधन झाले आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने (IRNA) आज सकाळी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला असून देशात ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.

हल्ल्याचे स्वरूप

इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर आणि तेहरानमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर ‘पिनपॉईंट’ बॉम्बिंग केले. या हल्ल्यात खामनेई यांच्या निवासाला लक्ष्य करण्यात आले होते. निवासा ठिकाणावर तब्बल ३० बॉम्ब टाकण्यात आले त्यात खामनेई यांच्यासोबतच मुलगी, नात आणि जावई यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तसेच इराणचे संरक्षण मंत्री आणि रिव्होल्युशनरी गार्ड्सचे (IRGC) काही उच्चपदस्थ अधिकारीही मारले गेल्याची शक्यता आहे.

इराणचा प्रतिहल्ला

खामनेईंच्या निधनानंतर इराणने आक्रमक पवित्रा घेतला असून दुबई, दोहा, बहरीन आणि कुवेत येथील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले आहेत. दुबई विमानतळावरही क्षेपणास्त्र पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, “इतिहासातील सर्वात वाईट माणसांपैकी एक, खामेनी, मरण पावला आहे… तो आपल्या गुप्तचर यंत्रणा आणि अत्यंत प्रगत ट्रॅकिंग सिस्टीमपासून वाचू शकला नाही आणि इस्रायलसोबत काम करून, तो आणि त्याच्यासोबत मारले गेलेले इतर नेते काहीही करू शकले नाहीत. इराणी लोकांसाठी त्यांचा देश परत मिळवण्याची ही सर्वात मोठी संधी आहे. आपण ऐकत आहोत की त्यांच्या अनेक आयआरजीसी, लष्करी आणि इतर सुरक्षा आणि पोलिस दलांना आता लढायचे नाही आणि त्यांना आपल्याकडून सूट हवी आहे.

मी काल रात्री म्हटल्याप्रमाणे, ‘त्यांना आता सूट मिळू शकते, पण नंतर त्यांना फक्त मृत्यूच मिळेल!’ आशा आहे की, आयआरजीसी आणि पोलिस शांततेने इराणी देशभक्तांसोबत सामील होतील आणि देशाला त्याच्या पात्रतेनुसार महानता परत मिळवून देण्यासाठी एक युनिट म्हणून एकत्र काम करतील. ही प्रक्रिया लवकरच सुरू झाली पाहिजे, कारण खामेनी केवळ मरण पावले नाहीत, तर देश पूर्णपणे नष्ट झाला आहे आणि अगदी एकाच दिवसात पूर्णपणे नष्ट झाला आहे.” संपूर्ण आठवड्यात किंवा मध्य पूर्व आणि खरोखर संपूर्ण जगात शांततेचे आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असेल तोपर्यंत जोरदार आणि अचूक बॉम्बहल्ला सुरू राहील.

दरम्यान युएई (UAE) आणि इतर आखाती देशांनी आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे ‘इमर्जन्सी अलर्ट’ दिले आहेत. या घटनेमुळे मध्यपूर्वेतील युद्ध आता अधिक भीषण वळणावर पोहोचले आहे. भारतासह अनेक देशांनी आपल्या नागरिकांना या भागातून प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!