मुंबई | दि. १३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – ठाणे येथे वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. मुलुंड आणि ठाण्याच्या दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूकही बंद झाली आहे. यामुळे, लोकल सेवेच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे.


अचानक आलेल्या या वादळी अवकाळीमुळे मुलुंड ठाणे दरम्यान ओव्हर हेड खांब कोसळला. त्यामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड होऊन मध्य रेल्वे सेवा ठप्प झाली. मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद झाली असून मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे.

लोकल गाड्या रुळावर एका मागे एक थांबवण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वे १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे. जलद रेल्वेच्या मार्गावर वाहतूक मात्र सुरळीत सुरु आहे. जोरदार आलेल्या या पावसामुळे काही ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. लोकल सेवा ठप्प झाल्याने प्रवासी बस, टैक्सी, रिक्षाने घर गाठत आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ते जाम झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान ठाणे नंतर आता हवामान विभागाने मुंबईतील इतर ठिकाणच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या काही तासात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून बाहेर जाताना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
