नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : चीनमध्ये पाच वर्षांनंतर आणखी एका धोकादायक विषाणूने हाहाकार माजवला आहे. ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) असे या विषाणूचे नाव असून कोरोना व्हायरस इतकाच हा संसर्गजन्य आणि जीवघेणा असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. इन्फ्लूएन्झा ए, एचएमपीव्ही, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड-१९ विषाणू वेगाने पसरत आहेत. रुग्णालयामध्ये गर्दी दिसत आहे.
एचएमपीव्ही फ्लूमध्ये कोरोना व्हायरससारखीच लक्षणे आहेत. या विषाणूच्या प्रादुर्भावानंतर आरोग्य अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. चीन आणीबाणीसदृश स्थितीत आल्याचा दावा केला जात असला तरी याला मात्र अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
■ चीनमध्ये मल्टीपल व्हायरस अटॅक !
सोशल मीडियावर ‘SARS-CoV-2’ नावाच्या एक्स हँडलने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “चीनमध्ये इन्फ्लूएंझा ए. एचएमपीव्ही, मायकोप्लाइमा न्यूमोनिया आणि कोविड-१९ सह अनेक विषाणूंमध्ये वाढ होत आहे. चीनमधील मुले न्यूमोनिया आणि “व्हाइट लंग” आजारांनी ग्रस्त आहेत. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या रोग नियंत्रण प्राधिकरणाने शुक्रवारी सांगितले की ते रहस्यमय न्यूमोनियाच्या प्रकरणांचा बारकाईने अभ्यास करीत आहेत. यामुळे अनेकदा हिवाळ्यात श्वसनाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते.
■ ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस म्हणजे नेमके काय ?
दरम्यान विविध अभ्यासातून असे दिसून आले आहे की, हा विषाणू कमीतकमी सहा दशकांपासून अस्तित्वात असून श्वसनाचा आजार म्हणून तो जगभर पसरला आहे. प्रामुख्याने खोकला आणि शिंकण्यामुळे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कामुळे किंवा दूषित वातावरणामुळे देखील संसर्ग होऊ शकतो. मनुष्यात त्याचा परिणाम तीन ते पाच दिवसांत दिसू लागतो.
चीनने गुरुवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, १६ ते २२ डिसेंबर दरम्यान श्वसन समस्यांच्या रुग्ण संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. आरोग्य अधिकारी कान बियाओ यांनी सांगितले की, चीनमध्ये हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये श्वसनाचे विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता आहे.